03 June 2020

News Flash

यशवंतरावांचा मध्यममार्ग

आधुनिक महाराष्ट्राच्या व भारताच्या इतिहासात यशवंतराव चव्हाण यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली.

अशोक चौसाळकर

महाराष्ट्राचा मंगलकलश आणणारे, या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दीर्घ मुलाखती राज्यशास्त्र व महाराष्ट्राच्या राजकारणाचे गाढे अभ्यासक प्रा. जयंत लेले यांनी घेतल्या, त्यांचे संपादित पुस्तक प्रथम इंग्रजीत आले, त्याचा मराठी अनुवादही नुकताच प्रसिद्ध झाला. या पुस्तकाची ओळख, आपल्या राज्याच्या ‘साठीचा गझल’ आळवताना वाचनीय ठरणारी..

आधुनिक महाराष्ट्राच्या व भारताच्या इतिहासात यशवंतराव चव्हाण यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे आपणास तीन भागांत विभाजन करता येईल. त्यातील पहिल्या भागात त्यांची जडणघडण आणि स्वातंत्र्य चळवळीतील भूमिका यांचा समावेश करता येईल. दुसऱ्या व तिसऱ्या भागात त्यांच्या महाराष्ट्रातील व राष्ट्रीय राजकारणातील कार्याचा समावेश करता येईल. १९४६ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांताच्या सरकारमध्ये गृहमंत्री असलेले मोरारजी देसाई यांचे संसदीय सचिव म्हणून ते नियुक्त झाले आणि १९८० साली ते देशाचे उपपंतप्रधान म्हणून निवृत्त झाले. या काळात त्यांनी राज्यात व केंद्रात अनेक क्षेत्रांत मूलगामी बदल घडवून आणले. ते एक अभ्यासू आणि परिस्थितीचे खोलवर विश्लेषण करणारे राजकीय नेते होते.

यशवंतराव चव्हाण यांची भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय मते आहेत, याचा वेध घेण्यासाठी कॅनडातील नामवंत राज्यशास्त्रज्ञ प्रा. जयंत लेले यांनी १९७०, १९७४ आणि १९७८ या काळात यशवंतरावांच्या मुलाखती घेतल्या. प्रा. प्रकाश पवार यांच्या मदतीने प्रा. लेले यांनी त्या इंग्रजीत ‘यशवंतराव चव्हाण रिफ्लेक्ट्स ऑन इंडिया, सोसायटी अ‍ॅण्ड पॉलिटिक्स’ या पुस्तकात संपादित केल्या आहेत. (या महत्त्वाच्या पुस्तकाचे मराठी भाषांतरही अलीकडेच प्रकाशित झाले.) भारतातील समाज आणि राजकारण या विषयावर यशवंतरावांनी जे प्रकट चिंतन केले आहे, ते या पुस्तकात वाचायला मिळते.

या पुस्तकाची तीन भागांत विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या भागाचे शीर्षक आहे- ‘यशवंतरावांचे विचार समजून घेण्यापूर्वी..’! यात प्रा. प्रकाश पवार, गोविंद तळवलकर आणि प्रा. जयंत लेले यांचे लेख आहेत. प्रा. पवार यांच्या लेखात यशवंतरावांवरील प्रकाशित साहित्याचा आढावा घेतला आहे. गोविंद तळवलकरांनी यशवंतरावांच्या राजकारणाची ‘शक्यतेच्या भाना’ची कला म्हणून समीक्षा केली आहे. ‘चव्हाण कालखंड आणि भारतीय समाज’ या शीर्षकाच्या दीर्घ लेखात तळवलकरांनी नवउदारमतवादी काळाच्या संदर्भात यशवंतरावांचे राजकारण आणि विचारसरणी यांचे विवेचन केले आहे. त्यांच्या मते, यशवंतराव हे पंडित नेहरूंच्या लोकशाही समाजवादाचे आणि मध्यममार्गाचे पुरस्कर्ते होते. या विचारांत देशातील बहुसंख्य गरिबांच्या विकासाचा व समाजिक न्यायाचा विचार केंद्रस्थानी होता. यशवंतराव डावीकडे झुकलेले असले, तरी त्यांचा सोव्हिएत रशियाचा पुरस्कार करणाऱ्या दिल्लीतील डाव्यांशी फारसा संबंध नव्हता. त्यांना आर्थिक विकास हवा होता; पण त्याचबरोबर या विकासाचे लाभ समाजातील वंचित वर्गापर्यंत पोहोचले पाहिजेत, असे त्यांना वाटे.

प्रा. लेले यांच्या मते, म्हणूनच यशवंतराव नियोजन, मिश्र अर्थव्यवस्था, सार्वजनिक क्षेत्राची कळीची भूमिका, लोकशाहीचे विकेंद्रीकरण आणि कल्याणकारी राज्य या नेहरूप्रणीत धोरणांचा पुरस्कार करीत होते. पण ते व्यवहारवादी राजकारणी होते. त्यामुळे नेहरूंच्या ‘सामुदायिक शेती’च्या कल्पनेऐवजी यशवंतरावांनी ‘सहकारी शेती’च्या कल्पनेचा पुरस्कार केला.

यशवंतराव जरी मध्यममार्ग अनुसरणारे होते, तरी त्यांना अभिप्रेत असणारे सामाजिक बदल प्रत्यक्षात आणण्यासाठी ते स्वत: प्रयत्न करत होते. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात प्रा. लेले यांनी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ, शेतकरी कामगार पक्ष, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि साताऱ्याचे राजकारण या विषयांवर यशवंतरावांना प्रश्न विचारले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने देव-हिरे यांचे नेतृत्व झुगारून देणे, मुंबई प्रांताच्या मुख्यमंत्रिपदाची निवड याबाबत यशवंतरावांनी अत्यंत सावध उत्तरे दिली आहेत. यशवंतरावांच्या राजकारणाचा हा सर्जनशील काळ होता आणि लोकशाही मार्गाने त्यांनी महाराष्ट्रात शेती, शिक्षण, सिंचन व सहकार यांत बदल घडवून आणले. कृषीमालावर प्रक्रिया करून सहकार, पंचायती राज व ग्रामविकास विभाग यांच्या साह्य़ाने महाराष्ट्रात कृषी-औद्योगिक समाज स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न होते. ओबीसी समाजासाठी ११ टक्के जागा त्यांनी राखीव केल्या. महाराष्ट्रातील उच्च जातींचा- यात मराठा ही जातही आलीच- आपणास विरोध आहे हे त्यांना माहीत होते. पण तो विरोध सौम्य करीत यशवंतरावांनी आपले उद्दिष्ट साध्य केले. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला बळकट असा सामाजिक पाया प्राप्त झाला. यशवंतरावांच्या उत्तरांवरून असे दिसते की, सुरुवातीच्या काळात जिल्ह्य़ाच्या राजकारणात वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचे मतभेद होते.

तिसऱ्या भागात राष्ट्रीय राजकारण आणि आणीबाणीनंतरचे राजकारण यावर यशवंतराव यांनी चर्चा केली आहे. १९६२ साली भारतावर चीनने आक्रमण केले आणि भारतीय सैन्याला माघार घ्यावी लागली. संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी नेहरूंनी यशवंतरावांची नियुक्ती केली. संरक्षण मंत्रालयात सेनाधिकाऱ्यांत व सनदी अधिकाऱ्यांत मतभेद, संघर्ष होते. पण यशवंतरावांनी सर्वाशी बोलून परिस्थिती नियंत्रणात आणली. सैन्य दलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यानंतर १९६५ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याने चांगली कामगिरी बजावली. पण यशवंतरावांची नियुक्ती दिल्लीच्या अभिजनांना आवडली नव्हती. काही जणांचा त्या पदावर डोळा होता व ते संरक्षण मंत्रालयाच्या कामात हस्तक्षेप करीत होते. त्यातच टी. टी. कृष्णम्माचारी यांची संरक्षण उत्पादनमंत्री म्हणून नेमणूक झाली. त्यांचा हस्तक्षेप वाढला. यामुळे यशवंतराव क्षुब्ध झाले आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मग नेहरूंनी त्यांना बोलावले. यशवंतरावांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘वडील जसे चुकणाऱ्या मुलास समजावून सांगतात’ तसे नेहरूंनी त्यांना सांगितले आणि यशवंतरावांनी राजीनामा मागे घेतला. १९६३ च्या कामराज योजनेनंतर टीटीके भारताचे अर्थमंत्री झाले आणि पटनायकांचे मुख्यमंत्रिपद गेले! यानंतर मात्र यशवंतरावांनी घाईघाईने निर्णय कधीच घेतला नाही.

संरक्षणमंत्री म्हणून जेव्हा यशवंतराव शस्त्रास्त्र खरेदीसाठी अमेरिका व इंग्लंडला गेले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हे देश भारतास शस्त्रास्त्रे देण्यास तयार नाहीत. अमेरिकेकडे त्यांनी आधुनिक विमानांची मागणी केली, तेव्हा अमेरिकेचे संरक्षणमंत्री मॅक्नामारा त्यांना म्हणाले की, आधुनिक विमानदळ ठेवण्याची भारताची कुवत नाही! चिनी आक्रमणाच्या संदर्भात त्यांनी ब्रिटनकडे पाणबुडीची मागणी केली, तेव्हा पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन त्यांना म्हणाले की, हिमालयामध्ये पाणबुडीची गरज नाही! प्रा. लेले यांनी चीनने भारतावर का आक्रमण केले, असा प्रश्न यशवंतरावांना विचारला. त्या वेळी यशवंतरावांनी तीन कारणे सांगितली- (१) चीनला भारताचा विकास रोखायचा होता. (२) भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणात जी प्रतिष्ठा मिळवली होती, ती नष्ट करावयाची होती. आणि (३) चीनला भारताने अलिप्ततावाद सोडावा असे वाटत होते. चीनला भारताचा भूप्रदेश ताब्यात घेण्यात रस नव्हता. नाही तर त्यांनी जिंकलेला प्रदेश सोडला नसता, असे त्यांचे मत होते. पण माझ्या मते, ही कारणे खरी नाहीत. चीनने भारतावर आक्रमण करण्याची तीन कारणे म्हणजे- (१) भारताने दलाई लामा यांना दिलेला आश्रय. (२) सिकयांग व तिबेटला जोडणारा रस्ता बांधण्यासाठी त्यांना अक्साई चीनचा भाग हवा होता. ते ताब्यात घेण्यासाठी वेळ अनुकूल आहे असे चीनला वाटले. (३) १९६१ साली चौ एन लाय यांचा शांती प्रस्ताव धुडकावून भारताने सीमेवर सुरू केलेली ‘फॉरवर्ड पॉलिसी’. या शांती प्रस्तावाप्रमाणे अक्साई चीनच्या बदल्यात पूर्वेकडे सवलती द्यावयास चीन तयार होता असे म्हणतात.

काँग्रेसच्या राजकारणाबाबत यशवंतराव सांगतात की, काँग्रेसअंतर्गत सिंडिकेट गटाचा उद्देश मोरारजी देसाईंना पंतप्रधानपद मिळू न देणे हा होता. लालबहादूर शास्त्री हे पूर्णत: सिंडिकेटचे उमेदवार होते. सिंडिकेट नेहरू आणि मोरारजी यांच्या विरोधात होते. यशवंतराव आणि मोरारजी यांचे जवळचे संबंध होते, पण १९६४ साली त्यांनी मोरारजींना पाठिंबा दिला नाही म्हणून मोरारजींनी माघार घेतली. पण १९६९ पर्यंत त्यांच्यात अधिक घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले होते. यशवंतरावांनी राष्ट्रपतिपदासाठी संजीव रेड्डींना पाठिंबा दिला होता. पण ते पराभूत झाले. पंतप्रधान इंदिरा गांधींना पदच्युत करण्याची कोणतीही योजना नव्हती, असे ते म्हणत असले, तरी रेड्डी यांचा विजय झाला असता तर पंतप्रधान बदलला गेला असता असा निष्कर्ष काढता येतो. १९७८ नंतर यशवंतरावांची महाराष्ट्राच्या राजकारणावरची पकड ढिली झाली. त्यांनी केंद्रातील मोरारजी सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव का मांडला आणि चरणसिंग सरकारात ते उपपंतप्रधान म्हणून का सामील झाले, याचे समाधानकारक उत्तर यशवंतरावांकडून मिळत नाही.

यशवंतरावांचे असे मत होते की, संसदीय लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला अपेक्षित उद्दिष्ट प्राप्त करता येईल. लोकशाही मार्गाने आपण  जलद गतीने विकास साध्य करू शकतो पण त्यासाठी कार्यक्षम आणि जाणकार प्रशासन यंत्रणा व लोकांचे सहकार्य अपेक्षित असते.

चव्हाण यांचे जवळपास २२ वर्षे दिल्लीत वास्तव्य होते, पण तेथे ते स्वत:ची ‘लॉबी’ तयार करू शकले नाहीत. त्यांचे असे मत होते की, दिल्लीच्या अभिजनवर्गामध्ये महाराष्ट्रीय लोकांबद्दल एक प्रकारची विकोपाची भावना होती. वरवर ते छत्रपती शिवाजी महाराज व मराठय़ांची इतिहासातील कामगिरी या बद्दल गौरवाने बोलत, पण त्यांचा अंतरीचा भाव भिन्न होता.

प्रा. लेले यांच्या या संपादित इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर माधवी ग. रा. कामत यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण व राजकारण समजावून द्यावयास हे पुस्तक महत्त्वाचे ठरणार आहे आणि त्यासाठी प्रा. लेले यांचे अभिनंदन केले पाहिजे.

‘यशवंतराव चव्हाण रिफ्लेक्ट्स ऑन इंडिया, सोसायटी अ‍ॅण्ड पॉलिटिक्स’

संवादक : जयंत लेले

संपादन : प्रकाश पवार

प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स

पृष्ठे : ५८०

ashok.chousalkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 12:20 am

Web Title: yashwantrao chavan reflects on india society and politics book by mr jayant lele zws 70
Next Stories
1 वेड आणि विनाश
2 बुकबातमी : मराठी माणसाच्या कर्तेपणाचा इतिहास
3 आरपारदर्शक वाचनसंसार
Just Now!
X