शहरातील रस्त्यांसाठी १५० कोटी रुपये मिळाले तर रस्ते चकाचक होतील. औरंगाबाद हा पर्यटन जिल्हा असल्याने जास्तीत जास्त निधी मिळावा, असा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवला जाईल, असे पालकमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांच्या खड्डय़ांच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. ३० सप्टेंबपर्यंत खड्डे बुजविण्याचे आदेशही देण्यात आले होते. येत्या १० दिवसांत खड्डे बुजविले जातील, असे कदम म्हणाले.

शहरातील बहुतांश रस्ते उखडलेले आहेत. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर काही ठिकाणी खड्डे बुजवले जात असले तरी हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी १० दिवसांचा कालावधी लागेल. येत्या ८-१० दिवसांत ही कामे पूर्ण झाल्यानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे रस्त्यांची पाहणी करतील, असेही त्यांनी सांगितले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी न्यायालयाने आदेश दिल्यावर महापालिकेने थोडीफार हालचाल केली. मात्र, अजूनही अनेक भागातील खड्डे तसेच आहेत. शहरातील रस्ते चकाचक करायचे असतील तर १५० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले जाते. महापालिकेकडून मंत्रिमंडळ बैठकीसमोर रस्त्यासाठी निधी मागितला जाईल, असे सांगितले जाते. दरम्यान, पैठण रस्त्याच्या कामास ३ ऑक्टोबरला सुरुवात करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

या कामाच्या निविदा तयार होण्यास कमालीचा उशीर झाला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. निविदांसाठी चार महिन्यांचा वेळ कशाला लागतो, असा सवालही त्यांनी केला.