औरंगाबाद : नामांकित वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ५८ किलो लंपास केलेल्या सोन्यापैकी २२ किलो सोने खरेदी करणाऱ्या सराफाने वितळवून त्याची विक्री केल्याचे प्राथमिक अहवालात नमूद असले तरी ते प्रत्यक्षात ३२ किलोपर्यंत असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आता व्यापारी राजेंद्र सेठिया याला अटक केली आहे.

याप्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच अंकुर राणे, राजेंद्र जैन, लोकेश जैन यांना अटक केली आहे. अंकुर राणे हा राजेंद्र जैन याला सोने देत होता आणि राजेंद्र जैन हा बँकांमध्ये तारण ठेवून पैसे उचलून ते व्याजाने द्यायचा. यातूनच त्याने सराफा व्यापारी राजेंद्र सेठिया याच्याशी संधान बांधून सोने नोटबंदी काळातील असल्याचे सांगून वितळवून देण्यासाठी गळ घातली. यातून दोघांमध्ये सोने खरेदीचा व्यवहार सुरू झाला. २२ हजार रुपये तोळ्याने सेठियाला राजेंद्र जैन याने सोने विक्री केली. तब्बल २२ किलो सोने जैन याने सेठियाला विक्री केले. सेठियाने ते सोने वितळवून विक्री केले.

दरम्यान, राजेंद्र जैन याने काही बँका, मुथ्थुट फायनान्समध्ये सोने ठेवल्याची माहिती असून मंगळवारी काही बँकांमध्ये जाऊन आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीही केल्याची माहिती आहे. तर राजेंद्र जैन याची २१ बँकांमध्ये ६० पेक्षाही अधिक खाती असून ती पत्नी, बहीण, कार चालक, फर्मच्या नावेही आहेत, अशी माहिती तपासात यापूर्वीच समोर आली आहे. तर दुचाकी, कारसह पोकलँड  मशीन अशी २६ वाहने देखील त्याने पेठेंचे दागिने गहाण ठेवून विकत घेतल्याचा पोलिसांचा संशय आहे.