News Flash

जलयुक्तची २५ टक्के कामे दर्जाहिन; त्रयस्थ संस्थेच्या पाहणीतील निष्कर्ष

जलयुक्त शिवारच्या कामाचा राज्य सरकार गेल्या वर्षभरापासून डांगोरा पिटत असले, तरी झालेल्या कामातील २५ टक्के कामे दर्जाहिन असल्याचा अहवाल शासकीय तंत्रनिकेतनमधील तज्ज्ञांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्चअखेरीस सुपूर्द

जलयुक्त शिवारच्या कामाचा राज्य सरकार गेल्या वर्षभरापासून डांगोरा पिटत असले, तरी झालेल्या कामातील २५ टक्के कामे दर्जाहिन असल्याचा अहवाल शासकीय तंत्रनिकेतनमधील तज्ज्ञांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्चअखेरीस सुपूर्द केला आहे. निकृष्ट कामांची दुरुस्ती कंत्राटदारांनी स्वखर्चाने करावी, असे आदेश जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिले आहेत. दुष्काळदाह सहन करणाऱ्या लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आहेत. त्यांच्या विभागामार्फत जलयुक्तची कामे होतात. मात्र, योग्य नियंत्रण नसल्याने कंत्राटदारांकडून दर्जाहिन कामे झाली आहेत.
राज्यातील सत्तेत बदल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या शाश्वत सिंचनासाठी जलयुक्त शिवार योजना राज्य सरकारने जाहीर केली. या योजनेला लोकसहभागातून मोठा प्रतिसाद मिळाला. सरकारी योजनेतून सिमेंट नालाबांध, कोल्हापूर बंधाऱ्याची दुरुस्ती, पाझर तलावाची कामे हाती घेण्यात आली. मात्र, पूर्वीच्या सरकारात ज्या पद्धतीने ही कामे होत असत, ती मागील पानावरून पुढे अशी पद्धत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कायम ठेवली. परिणामी दर्जाहिन कामांची मोठी जंत्रीच त्रयस्थ संस्थेने केलेल्या तपासणीतून पुढे आली आहे.
जलयुक्त शिवारच्या कामांची तपासणी करण्यासाठी पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमधील तज्ज्ञांची नियुक्त करण्यात आली. येथील प्राध्यापकांच्या पथकाने ४ महिने मेहनत घेऊन कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रत्येक कामाचे व्हिडिओ शूटिंग केले. स्वतंत्र छायाचित्रेही घेतली. मार्चपूर्वी कामाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केला. अहवाल प्राप्त होताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना स्वखर्चाने कामाची दुरुस्ती करून देण्याचे आदेश दिले आहेत.
२०१५-१६ मध्ये लातूर जिल्ह्य़ातील २०२ गावांत जलयुक्त शिवारची कामे हाती घेण्यात आली. सिमेंट नालाबांध, कोल्हापूर बंधाऱ्यांची दुरुस्ती व पाझर तलावासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २५ कोटी रुपये खर्च करण्याचे निश्चित केले. लघुसिंचन पाटबंधारे विभाग, लातूर सिंचन विभाग व लघुसिंचन, जि. प. पाणीपुरवठा विभाग यांना ही कामे दिली. डिसेंबरात झालेल्या कामांची तपासणी सुरू झाली. तपासणी पथकाने उत्कृष्ट, चांगली, समाधानकारक व निकृष्ट अशा चार प्रतींत कामाची वर्गवारी केली. सिमेंट नालाबांधाची सर्वाधिक चांगली कामे लातूर व रेणापूर तालुक्यांत झाली, तर शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्व कामे निष्कृष्ट झाली. या खालोखाल निलंगा व औशातील कामे निकृष्ट दर्जाची आहेत.
सिमेंटनाला बंधाऱ्यावर सरकारचा सर्वाधिक पसा खर्च झाला. एकूण ११५ कामांपकी फक्त ७ कामे उत्कृष्ट दर्जाची, ३४ चांगली, ४२ समाधानकारक, तर तब्बल २८ निकृष्ट दर्जाची असून चार कामे अपूर्ण आहेत. कोल्हापूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीची ३७ कामे होती. त्यात केवळ एक काम उत्कृष्ट, १९ चांगली, १५ समाधानकारक, २ निकृष्ट तर २ अपूर्ण आहेत. पाझर तलावांची १०० कामे करायची होती. यात फक्त एक काम चांगल्या दर्जाचे, दोन समाधानकारक, तर ९७ कामे अपूर्ण आहेत. केवळ माती टाकून त्याची दबईदेखील करण्यात आली नाही. पाऊस पडला तर आम्ही काम केले होते, पावसाने ते वाहून गेले, असे सांगून पसे लाटण्याची योजना होती. कंत्राटदाराच्या दुर्दैवाने पाऊस झाला नाही. तपासणीस कोणी येईल, असे त्यांना वाटत नव्हते. प्रत्यक्ष तपासणी सुरू झाली. त्यामुळे ही कामे अपुरी असल्याचे कंत्राटदारांनी सांगून टाकले.
सिमेंटनाला बंधाऱ्याची जी कामे झाली, त्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बेबनाळवाडी, राणी अंकुलगा, सय्यद अंकुलगा ही कामे इतकी निकृष्ट दर्जाची होती की, त्यात सिमेंटचे प्रमाण योग्य नव्हते. बांध बांधल्यानंतर त्यावर पाणी टाकले नव्हते. त्यामुळे केवळ हाताना खरवडले तरी त्याचे टवके निघत होते. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी गळती सुरू झाली. काम सुरू असताना एकही कनिष्ठ अभियंता फिरकला नाही. उपअभियंत्यांना तर कामे कुठे चालू आहेत याची माहितीही नव्हती.
निकृष्ट दर्जाच्या कामात शिरूर अनंतपाळने १०० टक्के गुण घेतले आहेत. पाचपकी ५ बांध निकृष्ट आहेत. निलंगा तालुक्यात १० पकी ६, औसा तालुक्यात २६ पकी ६, चाकूर तालुक्यात १२ पकी २, तर रेणापूर तालुक्यात १२ पकी ३ कामे निकृष्ट आहेत. उदगीरमध्ये ११ पकी २ कामे निकृष्ट आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2016 1:40 am

Web Title: 25 percent works qualityless in jalayuktashiwar
टॅग : Latur
Next Stories
1 इमारत बांधकाम परीक्षणाचे नांदेडच्या अभियांत्रिकीला पत्र
2 मराठवाडय़ास टँकरचा विळखा, बीडमध्ये सर्वाधिक ८३८ टँकर
3 आजपासून शेक्सपिअर महोत्सव
Just Now!
X