15 December 2017

News Flash

मुलाचं लग्न करायचंय? मध्यस्थाला २५० रुपये मोजा!

केवळ मुली पाहण्यासाठी प्रत्येकी किमान २५० रुपये मध्यस्थाला देण्याची प्रथा आता सुरू झाली आहे.

प्रदीप नणंदकर, लातूर | Updated: June 18, 2016 1:38 AM

मुलींची घटती संख्या, शिकलेल्या मुलींची वाढती अपेक्षा, मुलांची वाढती संख्या, बेरोजगारी, वाढलेले वय यामुळे प्रत्येक स्तरात लग्न न जमलेल्या मुलांची संख्या झपाटय़ाने वाढते आहे. मुलाचे लग्नवय निघून जात असल्यामुळे पालकांचा धीर सुटतो आहे. त्यातून जातिपातीच्या भिंती गाळून मुलीच्या शोधात मुलाकडील मंडळी प्रसंगी अन्य प्रांतांतही भटकत असून, केवळ मुली पाहण्यासाठी प्रत्येकी किमान २५० रुपये मध्यस्थाला देण्याची प्रथा आता सुरू झाली आहे.

कुटुंबनियोजनामुळे घरोघरी मुलांची संख्या कमी आहे. शिक्षणात, नोकरी शोधण्यात, व्यवसायात जम बसवण्यात वेळ चालल्यामुळे लग्नाचे वय वाढते आहे. अशा वाढलेल्या वयाच्या मुलांना योग्य स्थळच मिळत नाही. त्यातून मुली शोधण्याला पर्याय असत नाही. अनेक जण परजिल्हय़ात अथवा परप्रांतात जाऊन अनाथालयात रीतसर अर्ज करतात व त्यातून चांगले संसारही सुरू आहेत, मात्र लग्नाळू मुलांच्या गरजेचा गरफायदा घेण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर अनेक ठिकाणी वाढते आहे.  अर्थात, या पद्धतीने विवाह झाल्यानंतर त्यांचे संसारही चांगले सुरू आहेत. मुलगी कोणत्या जातीची आहे याबद्दल फारशी चौकशी केली जात नाही. मुलगीच मिळत नसल्यामुळे मुलाकडील मंडळी फारशा अटी घालण्याच्या मन:स्थितीत नसतात, असेही काही प्रकरणात दिसून आले आहे. बिदर, जहिराबाद, भालकी, गुलबर्गा अशा परिसरात अशा मध्यस्थ मंडळींची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. एकेकाळी मुलीचे लग्न जुळवण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांना अनेकांचे उंबरठे झिजवावे लागत असत. आíथक अडचणींमुळे मुलींपेक्षा २० ते २५ वर्षे वयाने मुलगा मोठा असला तरी लग्न झाल्याची अनेक उदाहरणे होती. आता काळ बदलला आहे. मुलांना मोठय़ा प्रमाणावर तडजोडी कराव्या लागत आहेत.

हुंडाच पण..

लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड अशा जिल्हय़ांतील मुले कर्नाटक, आंध्र प्रांतांतील अनेक जिल्हय़ांत जातात. त्या ठिकाणी मुलींचे योग्य स्थळ दाखवणारे मध्यस्थ आहेत. त्यांना अगोदर गाठून स्थळाची चौकशी करावी लागते. एक मुलगी पाहण्यासाठी २५० ते ४०० रुपये मोजावे लागतात. त्या भेटीत फक्त मुलगी पाहता येते. मुलीच्या आई-वडिलांशी जुजबी बोलता येते. स्थळ पसंत पडल्यास मुलीकडील मंडळींना मुलाचे घर पाहण्यासाठी १० रुपये किलोमीटरप्रमाणे गाडीभाडय़ाचा खर्च द्यावा लागेल, अशी अट मध्यस्थ घालतो. दोघांनाही स्थळ पसंत असल्यास लग्न जुळवण्यासाठी मध्यस्थ मुलाकडील मंडळींकडून ६० हजारांपासून १ लाखापर्यंतची मागणी मुलीकडील मंडळींची असल्याचे सांगत पसे घेतो. हा व्यवहार सगळा गुप्ततेने होतो. मुलाकडील मंडळींची गरज मोठी असल्यामुळे ते असे पसे मध्यस्थाला देतात.

 

First Published on June 18, 2016 1:38 am

Web Title: 250 rupees fees of marriage agents