ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राजकीय ताकद पणाला लावून प्रचारात आरोपांची राळ उठवल्याने दोघांसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या वैद्यनाथ नागरी सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी १०१ केंद्रांवर शांततेत ५५ टक्के मतदान झाले. परळीतील एकाच केंद्रावर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, खासदार प्रितम मुंडे, पंडितराव मुंडे, प्रज्ञा मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. या केंद्रावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी दि. २१ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

परळी येथील वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेच्या १७ संचालक पदासाठी एकूण ४१ शाखांच्या ठिकाणी १०१ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यालय आणि सर्वाधिक मतदार असलेल्या परळीत २७, माजलगाव, केज, बीड प्रत्येकी ६ तर गेवराई ३, धारुर, वडवणी, नेकनूर, शिरुर प्रत्येकी २, अंबाजोगाई ७, िलबोटा ६ यासह परभणी, लातूर, औरंगाबाद पुणे, जालना, सिल्लोड, पाथरी, गंगाखेड, उदगीर, अहमदपूर, सोलापूर, श्रीरामपूर, तुळजापूर अशा १०१ मतदान केंद्रांवर मतदारांनी हक्क बजावला. परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या केंद्रावर सकाळी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे व त्यांच्या परिवाराने मतदान केले. मतदानात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. गेल्या आठ दिवसांपासून प्रचाराच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत बँक ताब्यात घेण्यासाठी मुंडे बहीण-भावाने राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती. मंगळवारी २१ जून रोजी बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मतमोजणी होणार आहे.