८ हजार एकरांवरील पिकांचे नुकसान

नाशिकमधील अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्हय़ातील वैजापूर व गंगापूर तालुक्यांत आलेल्या पुरात अडकलेल्या वांजरगाव येथील ५९ जणांची एनडीआरएफच्या जवानांनी सुटका केली. दिवसभर पुरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. पाण्याची पातळी ओसरत असल्याने कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पुरानंतर रोगराई येऊ नये म्हणून या तालुक्यातील २६ गावांमध्ये आरोग्य पथके नेमण्यात आली आहेत. या गावांना शुद्ध पाण्यासाठी १५ टँकर देण्यात आले आहेत. पुराच्या पाण्यामुळे सुमारे ८ हजार एकरावरील पिकांचे नुकसान झाले असावे, असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक जिल्हय़ातील पावसामुळे वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील २६ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. वैजापूर तालुक्यातील वांजरगाव येथे पुराचे पाणी शिरल्याने अडकलेल्या १३० पैकी ५६ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अन्य व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान प्रयत्न करीत होते.

वैजापूरमधील स्थिती नियंत्रणात असली तरी गंगापूरमधील आठ गावांना पुराच्या पाण्याचा धोका आहे. हैबतपूर, बगडी, ममदापूर, जामगाव, कायगाव, अंमळनेर, लखमापूर या गावांची पुनर्वसन पूर्वीच झालेले असल्याने फारसा धोका नाही, असे अधिकारी सांगत आहेत. दरम्यान, पुरात वाहून गेलेल्या २२ वर्षीय प्रशांत मोहन सवाई यांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. पुराचा फटका बसलेल्या २६ गावांत ३०० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अंदाज येईल, मात्र शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. नदीकाठच्या गावातील जमीन खरवडून गेली असल्याने त्याबाबतचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी सांगितले. घरात पाणी शिरल्याने निवाऱ्याची सोय नसणाऱ्यांनाही मदत केली जाणार आहे.

सराला बेट भागात अडकलेल्या १००हून अधिक जणांनी सुरक्षितस्थळी जाण्यास नकार दिला होता. त्यांना पुराच्या पाण्याने वेढलेले असले तरी धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जायकवाडी जलाशयात पाणी येण्याचा वेग अधिक असल्याने येत्या दोन दिवसांत ते २५ टक्क्यांवर जाईल, असे सांगितले जाते. गुरुवारी दुपारी ४ वाजता जायकवाडी धरण १७ टक्क्यांवर गेले होते.

नागमठाण येथे येणारा पाण्याचा वेग एवढा होता की बुधवारी पाणी मोजणे अशक्यच होते. सायंकाळी नागमठाण येथे एक लाख क्युसेक वेगाने पाणी येत होते.