औरंगाबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. करोनाच्या धास्तीनं रक्ताच्या नात्यातील माणसांनीच ९० वर्षाय आजीला जंगलात टाकूण असंवेदनशीलपणा दाखवला आहे. करोनाबाधित ९० वर्षीय आजीला कच्चीघाटी परिसरातील जंगलात टाकून नातेवाईक फरार झाल्याची लाजीरवाणी घटना घडली.

या महिलेला करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर सरकारी रुग्णालयाला कळवणे आणि रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित होते. पण नातवाईक आणि कुटुंबियांनी तिला जंगलात सोडलं. वय झाल्यामुळे आजीला हालचाल करणेही कठीण होते. अशा परिस्थिती काळजी करणं गरजेचं होतं. पण, नातेवाईकांनीच या वृद्ध महिलेला जंगलात नेऊन टाकले. आजीसोबत केलेल्या वर्तनामुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

आजीबद्दलची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर या वृद्ध महिलेला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबधित आजीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुटुंबियांना आजीला सांभाळण्यास तयार नसल्यास आमचे सहकारी पोलिसांनी त्यांचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली आहे, असे चिखलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक महेश आंधळे यांनी लोकसत्ताला बोलताना सांगितले.