नवनाथ आवारेंची रविवारी दिवसभराची कमाई ३० हजार रुपये झाली. टरबूज, खरबूज, मोसंबी, अशी फळे त्यांनी एकाच दिवसात विक्री केली. तीही  फक्त मागणी आलेल्या घरांमध्येच. आवारे व त्यांच्या गटातील सदस्य फळांसह भाजीपाला आणि धान्यही घरपोच देत आहेत. त्यासाठी आवारे असे सांगतात की, ‘‘ग्राहकाने व्हॉट्सअ‍ॅपवर आदल्या दिवशी नोंदणी तेवढी करावी. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला माल आम्ही विक्री करत असून त्याला सध्याच्या स्थितीत प्रतिसादही उत्तम मिळत आहे.’’

करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र संचारबंदी असून गावोगावच्या नागरिकांपुढे दररोजचा भाजीपाला खरेदी करण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. भाजीपाला खरेदीसाठी औरंगाबादच्या जाधववाडी मंडईत मोठी गर्दी होत असून त्यातूनही आजाराची लागण होण्यासारखे अनेक प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील नागरिकांना घरातच भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी नवनाथ आवरेंसह काही शेतकरी गट शहरात सक्रिय झालेले आहेत.

गंगापूर तालुक्यातील दिघी येथील शेतकरी असलेले नवनाथ आवारे यांच्या मते औरंगाबादेत भाजीपाला-फळ-धान्य विक्रीचे एकूण तीनशे गट असले तरी सद्य:स्थितीत ३५ गट सक्रिय झालेले आहेत.

या ३५ शेतकरी गटाची एक यादी तयार करण्यात आली आहे. त्यावर त्या गटाचे नाव, गाव व संपर्कासाठी एक मोबाइल क्रमांक दिलेला आहे. संबंधित प्रमुखाच्या नावापुढील एका रकान्यात कुठल्या भाज्या त्यांच्याकडे मिळू शकतात, याची नावेही दिलेली आहेत. एखाद्याकडे हवी ती भाजी नसेल तर काय करायचे? यावर नवनाथ आवारे म्हणाले, ‘‘आम्ही ती उपलब्ध करून देतो. आम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आणि माफक दरात भाजीपाला घरपोच देत आहोत. सध्याच्या परिस्थितीत भाजीसाठी म्हणून नागरिकांना घराबाहेर पडण्याची वेळ येऊ नये, यासाठी घरपोच हा उपक्रम सुरू केलेला आहे. प्रत्येक भागात काही लोक नियुक्त आहेत. आदल्या दिवशी व्हॉटसअ‍ॅप भाजीची नोंदणी केली तर आम्ही ग्राहकाची ती गरज पूर्ण करतो आहेत. अगदी हादग्यांच्या फुलासारखी भाजीही आम्ही माफक दरात उपलब्ध करून देऊ शकतो. घरपोच भाजी पोहोचवण्यासाठीची माहिती महापालिकेसह वसाहत सोसायटीचे अध्यक्ष फ्रान्सिस यांना दिली आहे. त्या माध्यमातून शेतकरी गट काही गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्ष, सचिवांशीही जोडले गेले आहेत. यातून संपर्क वाढत असून एकगठ्ठा भाजी-फळांची मागणी नोंदवली जात आहे.’’

शेतकरी गटांकडून केवळ भाजीपालाच नव्हे तर टरबूज, खरबूज, मोसंबी, लिंबू, अंजीर, द्राक्षे अशी फळेही घरपोच दिली जात आहोत. त्याचे एक पॅकेजही तयार केलेले आहे. चार ते पाच भाज्या, दोन ते तीन फळे, असे ते पॅकेज आहे.