आदित्य ठाकरे यांच्या समवेत ‘विकास संवाद’मध्ये बुस्टर डोसची चर्चा

औरंगाबाद : हवाई वाहतूक वाढविताना किमान पुण्यापर्यंत रेल्वेने जोडा, पर्यटनस्थळांची माहिती देणारे किमान फलक लावा, राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाप्रमाणे उद्योगाच्या सांडपाणी प्रक्रियेसाठी सामूहिक सांडपाणी व्यवस्था बळकट करा, शहर विकासाठी सरकारच्या तीन-तीन नियोजन संस्था ठेवण्याऐवजी अधिकारी असणारी एकच संस्था करा, ऐतिहासिक आणि पर्यटन वास्तूच्या देखरेखीबाबत विशेष अधिकार असणारी एजन्सी नेमा, यासह विविध विधायक सूचनांची जंत्री औरंगाबादकरांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर ठेवली. शिवसेना नेते टिपणे काढून सूचना लिहून घेत होते, असे चित्र दिसून आले. चौकात मोठय़ा आवाजात घोषणा देऊन आक्रमक शिवसेनेचे बदलते स्वरूप विकास संवादामध्ये दिसून येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नागरिकांचे म्हणणे ऐकून घेते आहे, असे चित्र निर्माण करण्यात सेनेला यश येत असल्याचे वातावरण निर्माण होत आहे.

विकास संवादाच्या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातून उल्हास गवळी यांनी सेनेच्या नेत्यांना सणसणीत टोलाही लगावला, सामूहिक सांडपाण्याचे प्रश्न, राष्ट्रीय हरित लवादामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे नव्या उद्योगांना बंदी येऊ शकते अशी भीती असल्याने त्यात तातडीने लक्ष घालावे तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हवाई वाहतूक वाढविण्याच्या सूचना केली. या सूचना करताना २५ वर्षांपूर्वीही अशाच प्रकारच्या सूचना शिवसेनाप्रमुखांशी झालेल्या चर्चेत केल्या होत्या. त्यामुळे आजोबाच्या मनातील विकासाचे चित्र नातवाकडून पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी केली. जसवंत सिंग यांनी दरवर्षी पर्यटन परिषद व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून ऐतिहासिक देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. आदित्य वाघमारे यांनी सार्क देशातून येणारे पर्यटक शून्यावर आले असून पर्यटनवाढीसाठी फलक लावण्यापासून ते राज्य सरकारकडून धोरणात्मक बदल कसे अपेक्षित आहेत, याबाबत सूचना केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुढील काळात ई गव्हनर्ससाठी केले जाणारे करार जरी राज्य पातळीवरील असतील, तरी त्याची अंमलबजावणी विकास प्रक्रियेत तिसऱ्या श्रेणीत असणाऱ्या कोल्हापूर, औरंगाबादसारख्या शहरातून व्हावी असे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे सीआयआय या औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष मुकुंद कुलकणी यांनी सांगितले. या सर्व सूचनांबरोबरच शहराच्या विकासासाठी एकमुश्त रक्कम देता येईल काय, हे पाहावे आणि तशी अतिरिक्त मात्रा (बुस्टर डोस) औरंगाबादसाठी द्यावी, अशी मागणी क्रेडाईचे प्रमोद खरनार यांनी केली. राम भागले यांनी शिक्षणाचे महत्त्व यावरही सूचना केल्या. हा संवाद सुरू असताना शिवसेना नेते टिपणे काढत होते. या विधायक सूचनांच्या अनुषंगाने बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘पूर्वीही अशा सूचना येत पण तेव्हा सत्तेत होतोही आणि नव्हतो देखील. आता बदल करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण असे संवादाचे कार्यक्रम वारंवार होत राहावेत म्हणून सरकार सहायता गट निर्माण होईल असे प्रयत्न केले जातील.’

नेहमी चौकांमध्ये आंदोलनासाठी शिवसेना कार्यकर्त्यांचे नेते संवाद सुरू असताना टिपणे  घेत असल्याचे दिसून आले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठ विकास कामांचे उद्घाटन करत शिवसेना नेत्यांच्या संवाद कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सूचना केल्या आणि त्या लिहून घेतल्या गेल्या.