सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी मानव विकास मिशनच्या वतीने घेण्यात आलेल्या नवीन योजनेमुळे चार गावांना अधिक लाभ झाला असल्याचा निष्कर्ष यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या वतीने काढण्यात आला आहे. वाशिम जिल्हय़ात सिंचन विहिरींचे पुनर्भरण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमाचे मूल्यमापन नुकतेच करण्यात आले.
वाशिम तालुक्यातील भोयता, मालेगाव तालुक्यातील सुदी, रिसोडमधील कवठा व मनोरामधील सावरगाव या चार गावांमध्ये सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामधील एका गावास २५ लाख रुपये देण्यात आले होते. सिंचन विहिरीच्या पुनर्भरणासाठी गॅबियन बंधारे, रिचार्ज शाफ्ट, रिचार्ज ट्रेंच व भूमिगत सिमेंट बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले. मानव विकास मिशनचे विनय कुलकर्णी, डॉ. मीनल नरवणे यांसह अधिकाऱ्यांनी ही योजना यशस्वी व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न केले.
ज्या गावांमध्ये ८ ते १२ महिने टँकरने पाणीपुरवठा होत होता, तेथे वेगवेगळय़ा उपाययोजना हाती घेतल्याने पाणीपातळीत वाढ झाली असल्याचा निष्कर्ष यशदाच्या अहवालात काढण्यात आला आहे. योजना राबवण्यापूर्वी सर्व विहिरी कोरडय़ा पडायच्या. पिण्यासाठी पाणीदेखील लांबून आणावे लागे. सिंचनाच्या उपाययोजनांमुळे ५.५ मीटर पाणी उपलब्ध झाल्याचे कवठा तालुक्यातील नागरिकांनी यशदाच्या मूल्यमापन करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितले. या गावात १०० विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले होते.
सुदी येथील ८, भोयता येथील १० व सावरगाव येथील १८ विहिरींच्या पुनर्भरणामुळे अधिक फायदा झाल्याचे निष्कर्ष आहे. वाशिम जिल्हय़ातील जशी भूगर्भाची स्थिती आहे तशी अन्यत्र आढळल्यास या योजनेची व्याप्ती वाढवू, असे मानव विकास आयुक्त भास्कर मुंडे यांनी सांगितले. ही योजना गरज असल्याचेही यशदाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.