शहराला जूनपर्यंत १५ दिवसांतून एकदा नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, पाण्याच्या तुटवडय़ामुळे काही दिवस टँकरनेच पाणी दिले जाणार आहे.
एकाच दिवशी शहरातील सात प्रभागांत ७५ टँकरने ६ फेऱ्या पूर्ण करीत प्रत्येक कुटुंबास २०० लिटर पाणी दिले जाणार आहे. पाच दिवसांत संपूर्ण शहरात हा फेरा पूर्ण करून पुन्हा पाच दिवसांनंतर याच पद्धतीने पाणी दिले जाणार आहे. नागरिकांनी आपल्या घरासमोर २०० लिटरचे बॅरल ठेवून मनपास सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी केले आहे. शासकीय विश्रामगृहावर आयोजित सुकाणू समितीच्या बठकीत त्यांनी ही माहिती दिली. खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार अमित देशमुख, महापौर अख्तर शेख, रवी सुडे, चंद्रकांत चिकटे, शैलेश स्वामी, प्रदीप मोरे, मकरंद जाधव, मोईज शेख, रवींद्र जगताप आदी उपस्थित होते.
शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी शासनस्तरावर जो पाठपुरावा करावा लागेल, त्यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असल्याचे खासदार गायकवाड यांनी बठकीत सांगितले. लातूरच्या तात्पुरत्या पाणीप्रश्न व दीर्घकालीन उपाययोजनांसाठी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीस जाणार असल्याचेही बठकीत निश्चित करण्यात आले. शहराला प्रत्येकास पाणी मिळावे, या साठी प्रत्येक नगरसेवकाच्या पुढाकाराने जलमित्र समिती स्थापन करावी. पालिकेने भांडणे वाढणार नाहीत, या साठी पोलिसांची मदत घ्यावी. डोंगरगाव, भंडारवाडी व बेलकुंड येथून टँकरने पाणी उचलण्याबरोबरच तात्पुरत्या स्वरूपात का होईना जलवाहिनीने पाणी मिळावे, या साठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा लागेल. खासगी टँकरचे दिवसेंदिवस वाढणारे दर नियंत्रणात यावेत, या साठी मनपाने लक्ष घालावे, अशी सूचना आमदार देशमुख यांनी केली. घराघरातून वाया जाणारे सांडपाणी मुरवण्यासाठी शोषखड्डे मोहीम हाती घ्यावी व पुनर्भरणाचे कामही गतीने करावे, अशी सूचना मकरंद जाधव यांनी केली. महापौर शेख यांनी या बाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय करून अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली.
धनेगाव धरणात फक्त १५० एमएलडी पाणी
धनेगाव धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. धरणात केवळ १५० एमएलडी इतकाच पाणीसाठा शिल्लक असून हे पाणी नळाद्वारे दिले तर लवकर संपेल. या साठी टँकरने पाणी वितरित केले जाणार आहे. धनेगाव धरणात चर खोदून पाणी उपलब्ध झाल्यावर पुन्हा नळाने पाणी देण्याचा पर्याय उपलब्ध होण्यासारखी स्थिती निर्माण झाली तरच नळाद्वारे पाणी दिले जाणार आहे, अन्यथा टँकरला पर्याय राहणार नाही.