सत्तेची कोंडी झाली नसती तर मंत्री पदासाठी मुंबईच्या दिशेने नेत्यांच्या गाडय़ा धावल्या असत्या. पण मराठवाडय़ात शनिवारचा दिवस ‘नेते बांधावर’ असे दृश्य सर्व जिल्ह्य़ांमध्ये होते.

औरंगाबादमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे, हिंगोलीत अतुल सावे,  संभाजी पाटील निलंगेकर, तानाजी सावंत यांनी पिकांची पाहणी केली. नव्याने निवडून आलेले आमदार आणि नेते सारेजण बांधावर दिसून आले. प्रत्येकाने पिकाची पाहणी केली. ओला दुष्काळ जाहीर करू, अशी आश्वासने दिली. मदत केली जाईल, असे सत्ताधारी नेते आणि आमदार आवर्जून सांगत होते. पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर मराठवाडय़ात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचेही दौरे होणार आहेत.

भिजलेले धान्य, कोंब आलेली मक्याची कणसे, बाजरीच्या कणसातून झालेली उगवण, जिथे पीक काढून टाकले तेथेच कोंब उगवले, सारे खरीप वाया गेले, अशा तक्रारी गावोगावी शेतकरी करत होते.  एकनाथ शिंदे यांनी गंगापूर तालुक्यातील काही गावांचा दौरा केला, तर सावे यांनी हिंगोली तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. सोयाबीन, ज्वारी, तूर आणि फुलांच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनीही मतदारसंघात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. जालना जिल्ह्य़ातील जाफराबाद तालुक्यात अतिवृष्टीमुळे जमिनी खरवडून गेल्या होत्या.

टेंभुर्णी येथे शंभर मेंढय़ा मृत्युमुखी पडल्या होत्या. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी बदनापूर येथील भराडखेडा परिसरात भेट देऊन पाहणी केली. आमदार नारायण कुचे, औशाचे आमदार अभिमन्यू पवार, उदगीरचे  संजय बनसोडे, अहमदपूरचे बाबासाहेब पाटील यांनीही पिकांची पाहणी केली. सत्ता स्थापनेपेक्षा ज्यांनी आशीर्वाद दिले, त्या शेतकऱ्यांचे संकट अधिक गंभीर असल्यामुळे त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आलो आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नेते बांधावर आल्यामुळे यंत्रणाही खडबडून जागी झाली होती. गावोगावी पंचनामे सुरू झाले असून बीड जिल्ह्य़ात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.