दहशतवादी हल्ल्यानंतर दु:ख व्यक्त करण्यापेक्षा युद्ध करावे, असा सल्ला शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील गुलमंडीमध्ये मंगळवारी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद… नवाज शरीफ मुर्दाबाद…’ अशी घोषणाबाजी केली. तसेच पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. यावेळी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, अमरनाथ यात्रेत मृत्युमुखी पडलेले यात्रेकरू मोदींच्या गुजरातमधील होते. हल्ला झाला त्यानंतर मोदींनी दुःख व्यक्त केले. पण दुःख किती दिवस व्यक्त करायचं? त्यापेक्षा युद्ध करावे. यावेळी ‘जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी शिवसैनिकांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अमरनाथ यात्रेवर हल्ला झाला तर हज यात्रेला मुंबईमधून विमान जाऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर यात्रेला संरक्षण देण्यात आले. आता दिल्लीत मोदी सरकार आहे. एवढेच नाही तर जम्मू काश्मीरमध्येही त्यांचेच सरकार आहे. पण तरीही सरकारकडून अमरनाथ यात्रेला संरक्षण दिल जात नाही, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. सीमेवर जवान शहीद होत असताना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध सुधारणे अशक्य असल्याचेही यावेळी खैरेंनी सांगितले. बाळासाहेबांनी केलेल्या घोषणेप्रमाणे शिवसेना वागेल. लोकसभेच्या अधिवेशनात दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा  शिवसेनेचे खासदार उचलून धरतील, असा इशाराही खैरे यांनी दिला. महिला शिवसैनिकांनी देखील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले.