खासदार दानवेंच्या भोकरदनमध्ये खोतकर यांचे आव्हान

‘मी मैदान सोडणारा नाही, योग्य वेळ आली की हातोडा मारल्याशिवाय राहणार नाही,’ असे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भोकरदन येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून खोतकर आगामी लोकसभा निवडणूक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्या पाश्र्वभूमीवर खासदार दानवे यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या भोकरदनमध्ये खोतकर यांनी केलेले हे वक्तव्य सूचक मानले जात आहे.

खोतकर म्हणाले,की प्रारंभीच्या काळात भोकरदन तालुक्यात शिवसेनेची मोठी ताकद होती आणि आजही आहे. या भागातील शिवसैनिकांना चांगले दिवस येणार आहेत. कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात शिवसेनेच्या शाखा उघडाव्यात. लोकसभा निवडणूक आपण लढविणार असल्याची चर्चा पक्ष कार्यकर्ते आणि जनतेत आहे. परंतु हा निर्णय घेणे आपल्या हातात नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी जर आदेश दिला तरच ते शक्य आहे. तसे झाले तर आपण मैदान सोडणार नाही आणि विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच मतदार शिवसेनेला निवडून देतात. त्यामुळे सत्तेत असलो तरी आम्ही सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवीत आहोत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास शिवसेनेचे जिल्हा उपपप्रमुख रमेश गव्हाड, मनीष श्रीवास्तव, तालुकाप्रमुख नवनाथ दौंड, कैलास पुंगळे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

भोकरदन येथील शिवसेना मेळाव्यानंतर याच तालुक्यातील वालसावंगी येथील एका सत्कार सोहळ्यात खोतकर आणि दानवे एकाच व्यासपीठावर होते.