औरंगाबाद येथे शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता, असा दावा शिवसेना आणि एमआयएम या दोन्ही पक्षांच्यावतीने सोमवारी करण्यात आला. हिंसाचारादरम्यान तिखटाचे पाणी, गोटय़ा आणि गुलेर याचा वापर तर झालाच. शिवाय पेट्रोल आणि रॉकेल असे ज्वलनशील पदार्थ दंगलग्रस्त भागात एवढय़ा मुबलक प्रमाणात कसे पोहोचले, असा प्रश्न दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी उपस्थित केला. या भागातील नागरिकही याच सुरात बोलत आहेत. राजाबाजार, नबाबपुरासह शहागंज, गांधीनगर या भागांत झालेल्या हिंसाचारात पोलिसांच्या भूमिकेवर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. पोलिसांना पुढे करून दंगलखोर गाडय़ा जाळत होते. काही जणांकडून हत्यारे सापडली. त्याचे छायाचित्रणही उपलब्ध आहे. ते पोलिसांना मिळत नसेल तर आम्ही ते देऊ, असे सांगत त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर हिंसाचार वाढविल्याचा आरोप केला.

सोमवारी दुपारी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. जर शिवसैनिक प्रतिकारास उभा राहिला नसता तर शहरभर हिंसाचार पसरला असता. आम्ही पोलिसांसह नागरिकांचे संरक्षण केले असल्याचा दावा खासदार खैरे यांनी पोलीस आयुक्तांसमोर केला. स्वसंरक्षणार्थ उभे राहणे चूक कसे असेल, असा सवाल करत आम्ही आमच्या लोकांचे संरक्षण करायचे नाही का, असा प्रश्न त्यांनी केला. केवळ नागरिकांचे रक्षण केले असे नाही, तर तेथे उपस्थित पोलिसांना देखील शिवसैनिकांनीच वाचविले, असे ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह प्रत्यक्ष हिंसाचाराच्या वेळी उपस्थित असणाऱ्यांनी काय आणि कसे घडले, याची माहिती पोलीस आयुक्तांना दिली.

दरम्यान, रविवारी दुपारी पोलिसांच्या छत्रछायेखाली राजाबाजारमधील नागरिकांनी नबाबपुरा भागात कसा हिंसाचार घडवून आणला याचे चलचित्र अनेकांकडे उपलब्ध झाले. साडेनऊ मिनिटांच्या या चलचित्रामध्ये दंगेखोरांबरोबर पोलीस हातात हात देत आहेत आणि त्यानंतर त्याच व्यक्ती पुढे जाऊन गाडय़ा जाळताहेत, असे दिसून येत होते. या चलचित्रांचा आधार घेत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार बैठक घेऊन औरंगाबादमध्ये घडलेला हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग होता, असे सांगितले. निवडणुका जवळ येत आहेत. त्याचबरोबर शहागंज परिसरातील फळविक्रेत्यांवर वर्चस्व कोणत्या गुंडांचे या वादातून हिंसाचार भडकविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

हिंसाचार पूर्वनियोजित होता, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनीही केला. घराच्या छतावर दगडांचा खच असणे, गुलेर बांधलेली असणे, रॉकेलचा साठा उपलब्ध असणे, हे कशाचे लक्षण आहे, असा सवाल केला जात होता. याच प्रकारचे प्रश्न नबाबपुरा भागातूनही नागरिक विचारत होते. त्याला एमआयएमच्या आमदाराने वाचा फोडली. हिंसाचाराचा कट पूर्वनियोजित होता, हे दोन्ही बाजूंनी सांगितले जात होते.

सर्व अधिकारी एकाच वेळी रजेवर कसे?

ज्या दिवशी दंगल झाली, त्या दिवशी प्रभारी पोलीस आयुक्त मुंबईला होते. तसेच दोन उपायुक्तही रजेवर जातात. असे कसे घडते? पोलीस दलाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अशा पद्धतीने शहर वाऱ्यावर सोडता येत नाही, असे म्हटलेले आहे. तरीसुद्धा कोणीच अधिकारी उपस्थित नसतात. त्यामुळे पोलीस आणि दंगेखोर मिळून गाडय़ा जाळतात, असा आरोप एमआयएमच्यावतीने करण्यात आला. तर जाणीवपूर्वक नजर ठेवून काहीजणांची घरे जाळण्यात आली. त्यावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. तिखटाचे पाणी वापरण्यात आले. हे सारे पूर्वनियोजित असल्याशिवाय कसे घडले, असा सवाल शिवसेनेच्यावतीने करण्यात आला.