महापालिका आयुक्त म्हणून सुनील केंद्रेकर यांच्याकडे दिलेला अतिरिक्त कार्यभार काढून घेत पुणे येथील अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बाकोरिया यांची नियुक्ती करण्याचे आदेश सोमवारी काढण्यात आले. या नव्या प्रशासकीय घडामोडीमुळे सरकारविरोधी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. काही संघटना केंद्रेकर यांनाच तीन वष्रे महापालिका आयुक्त म्हणून नेमावे या मागणीसाठी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. उपमहापौर प्रमोद राठोड व स्थायी समितीचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरविले आहे.
पुणे येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करणारे बाकोरिया यांची ओळखही धडाडीचे अधिकारी असल्याचे सांगितले जाते. तथापि केंद्रेकर यांच्या कामाचा धडाका आणि त्यांनी अल्पावधीत महापालिकेला लावलेली शिस्त लक्षात घेता सर्वसामान्यांना दिलासा वाटेल, असे वातावरण निर्माण झाले होते. समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदारापासून ते कचऱ्याच्या समस्येपर्यंत विविध कामांचा त्यांचा जोर वाखाणला जात होता. अगदी दोन दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेत त्यांनाच पूर्ण वेळ आयुक्त म्हणून नेमणूक द्यावी, असा ठराव महापालिकेत मंजूर करण्यात आला होता. त्याची प्रत मुख्यमंत्री कार्यालयात पोहचण्यापूर्वीच सोमवारी महापालिका आयुक्त म्हणून बाकोरिया यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले. ते बुधवारी पदभार स्वीकारतील, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही नियुक्ती रद्द व्हावी, असे प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. काही संघटना केंद्रेकरच हवेत, या मागणीसाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना व प्रधान सचिवांना सीएमआयने विनंती केली होती. मात्र, अजून तसे आदेश मिळाले नाहीत. निर्णयाची वाट पाहू मग निर्णय घेऊ, असे सीएमआयएचे आशिष गर्दे यांनी सांगितले. लोकनीती मंचचे श्रीकांत उमरीकर यांनी, असे होणे चुकीचे आहे. आम्ही आंदोलन करू, असे सांगितले. नवीन अधिकाऱ्याला महापालिकेचा कारभार समजायला बराच वेळ लागेल. त्यामुळे शहर पुन्हा मागे जाईल, असे बोलले जात आहे.