बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापकांच्या पत्राने आश्चर्य

लोकसत्ता खास प्रतिनिधी

औरंगाबाद : एका बाजूला करोनाचे भय दाटलेले असताना  बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रमुखांनी व्यवस्थापकांना आरोग्यविमा विकण्याची हीच सुवर्णसंधी असल्याचे कळविले आहे. त्यांच्या या सूचनांमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच साथरोग पसरलेला असताना गर्दी चुकवून बँकेत येणाऱ्या माणसाला विम्याचे महत्त्व पटवून सांगावे आणि आरोग्यविम्याचे उद्दिष्ट गाठता येईल का, यासाठी २१ मार्चपर्यंत विशेष प्रयत्न करावेत, असे कळविणे एका अर्थाने अतिरेक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

करोनामुळे साथरोगांबाबत जागृती होत आहे. अशा काळातच आरोग्य विमा विकण्याची संधी असल्याचे सांगत युनायटेड इंडिया, महास्वास्थ्य योजना, यूएनआय सिटी केअर पॉलिसी यासह विविध प्रकारच्या विम्याची रक्कम भरून घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. या क्षेत्रातील बँकांची कामगिरी तशी चांगली नसल्याचा उल्लेख करून विमा काढण्यासाठी चार दिवस जोरदार प्रयत्न करावेत अशा सूचना व्यवस्थापकीय संचालक एम.जी. महाबळेश्वरकर यांनी दिल्या आहेत.

या अनुषंगाने ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशनचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर म्हणाले, ‘सध्या सर्वसामान्य माणसांच्या मनात भय आहे. अशा वेळी त्याला अडवून  विमा विकत घे, असे म्हणणेच चुकीचे आहे. एरवी हे काम सहजपणे करता आले असते. पण आता विमा घेण्याविषयी किंवा ते काढावा यासाठी समुपदेशन करणे म्हणजे अतिरेकच ठरेल.’ बँकेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या गर्दीत पुरेशी काळजी घेणेही दिवसेंदिवस अवघड बनलेले आहे. आरोग्याची आणीबाणी निर्माण झालेल्या काळात विमा विका, अशी  सूचना करणारे पत्र मागे घ्यावे, अशी विनंती बँकेच्या नियोजन व्यवस्थापकांकडे केली आहे.