News Flash

भाजप सरकार फसवे धनंजय मुंडे यांचा आरोप

शासनकत्रे आम्ही शेतकरी असल्याचे भासवत असून आतापर्यंत शेतकऱ्यांना दुष्काळाची कुठलीही मदत अथवा उपाययोजना केल्या नाहीत.

भाजप सरकार फसवे धनंजय मुंडे यांचा आरोप

शासनकत्रे आम्ही शेतकरी असल्याचे भासवत असून आतापर्यंत शेतकऱ्यांना दुष्काळाची कुठलीही मदत अथवा उपाययोजना केल्या नाहीत. हे सरकार फसवे आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी येथे केला. जोपर्यंत कर्ज माफी होत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असा इशाराही मुंडे यांनी यावेळी दिला. पाथरी येथे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरात बांधलेल्या ७ सभागृहांचे उद्घाटन आणि लोकार्पण आमदार मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या सोहळ्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
भाजपने शेतकऱ्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवली, परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांची निराशा केली. दोन्ही सरकार केवळ शहरी भागाचा आणि धनदांडग्यांचाच विकास करत आहेत. १८ महिन्यांत सरकारने शेतकरी विरोधी धोरणे राबवून भांडवलदारांचे हित साधले आणि ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत, असा आरोपही मुंडे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा वेळा ‘मन की बात’ हा आकाशवाणीवर घेतलेल्या कार्यक्रमात एकदाही शेतकऱ्यांचा उल्लेख केला नाही, असे सांगून दोन्ही सरकार आम्ही शेतकरी असल्याचे भासवत आहेत. मात्र प्रत्यक्षात शेतकरी संकटात असताना कुठलीही घोषणा केली नाही अथवा उपाययोजनाही केल्या नाहीत, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त कर्नाटकला २ हजार कोटी तर गुजरातला ५ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. परंतु त्यांची सत्ता असलेल्या महाराष्ट्राला अजून एक रुपयाही दिला नाही. सरकारने शेतकऱ्यांसाठी तिजोरी रिकामी करावी तरच तो जगेल, असे सांगत राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तत्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अन्यथा नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला. यावेळी  त्यांनी आमदार दुर्राणी यांनी पाथरी शहरात सर्व समाजासाठी बांधलेल्या सभामंडप व मंगल कार्यालयाने  विकासाचा पॅटर्न निर्माण केला आहे, असे  सांगून आमदार दुर्राणी यांच्या कामाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दुर्राणी तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय भांबळे, डॉ. मधुसूदन केंद्रे, रामराव वडकुते, जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर, नगराध्यक्ष जुनेद दुर्राणी, जि.प. शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे, उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, अनिल नखाते, बाळासाहेब जामकर आदींची उपस्थिती होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 1:10 am

Web Title: bjp government deceptive dhananjay munde
टॅग : Dhananjay Munde
Next Stories
1 ‘दाऊदला फरफटत आणण्याचे मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करणार’
2 ‘गोपीनाथगड गरीब माणसाला संघर्षांची प्रेरणा देईल’
3 ‘शेतकऱ्यांसाठी आता हवा दुष्काळ निवारण आयोग’
Just Now!
X