औरंगाबाद : औरंगाबादेत भाजप व शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचा मनोमिलन मेळावा दोनच दिवसांपूर्वी घेण्यात आलेला असताना आणि महानगरपालिकेत पक्ष सत्तेत सहभागी असतानाही भाजपच्या नेत्या महिला व बालकल्याण सभापती अ‍ॅड. माधुरी अदवंत-देशमुख यांनी मंगळवारी मनपासमोर वॉर्डातील पाणी समस्येच्या कारणावरून उपोषण केले. त्यांच्या या आंदोलनात सहभागी होत भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, नगरसेवक राजगौरव वानखेडे आदींनी पाठिंबा दिला.

महिला व बालकल्याण सभापती अ‍ॅड. माधुरी अदवंत यांनी आपल्या वॉर्डातील पाणी समस्या सोडवण्यासाठी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचा मनोमिलन मेळावाही घेण्यात आला होता. युतीतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत मनोमिलनाचा कार्यकत्रे, पदाधिकाऱ्यांना संदेश दिला. यानंतरही अ‍ॅड. अदवंत यांनी पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अ‍ॅड. अदवंत यांच्या मागणीवर तोडगा काढला जाईल. त्या आंदोलन मागे घेतील, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारीच पत्रकार बठकीत सांगितले होते. मात्र मंगळवारी सकाळपासून मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती अ‍ॅड. माधुरी अदवंत यांनी उपोषण सुरू केले. त्याला अनेक भाजपच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभाग नोंदवला. महापौर नंदकुमार घोडेले, मनपाचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. अखेर १ एप्रिलपासून पाणीसमस्या सुटलेली दिसेल, असे सांगितल्यानंतर एक एप्रिल म्हणजे खोटे आश्वासन देण्याची तारीख असल्याने आंदोलनकर्त्यांनी आक्षेप घेतला. मात्र ३० मार्चपर्यंतच पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.