News Flash

औरंगाबाद महानगरपालिकेतून भाजप सत्तेबाहेर

विजय औताडे यांचा उपमहापौरपदाचा राजीनामा

विजय औताडे यांचा उपमहापौरपदाचा राजीनामा

औरंगाबाद : राज्यातील नव्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहराच्या १६८० कोटी रुपयांच्या योजनेला स्थगितेचे कारण सांगत भाजपचे विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा शुक्रवारी अचानकपणे राजीनामा दिला.

महानगरपालिकेत अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शहरासाठीच्या १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याचे कारण पुढे करून औताडे यांनी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे राजीनामा सोपवला. सभागृहात राजीनामा स्वीकारण्याचे अधिकार हे महापौर तथा पीठासीन अधिकाऱ्यांचे असतात. त्यामुळे उपमहापौरपदाचा राजीनामा कोणी मंजूर करायचा, असा तांत्रिक प्रश्न निर्माण झाला आहे.

तिजोरीत खडखडाट असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेचा २४१९.९५ कोटी रुपये खर्चाचा आणि ५५ हजार रुपये शिलकीचा ३७ वा अर्थसंकल्प सभागृहासमोर मांडून त्याला मंजुरी मिळवण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. या सभेची सुरुवात मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्याच्या निमित्ताने अभिनंदनाचा ठराव घेण्यावरून झाली. यातून औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्याचा मुद्दाही भाजप सदस्यांकडून पुढे करण्यात आला आणि वादाला सुरुवात झाली. पिठासनावरून उतरून उपमहापौर औताडे हे सभागृहातील इतर भाजप सदस्यांच्या सोबत बसले. तेथून त्यांनी १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठय़ाच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याचा इतर सदस्यांकडून पुढे करण्यात आलेल्या सुरात सूर मिसळला. त्यानंतर पदाचा राजीनामा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड, बापू घडामोडे, राजू शिंदे आदी सदस्य होते.

औरंगाबादमध्येही ‘गनिमी कावा’ फसल्याची चर्चा

औताडे यांनी दिलेला राजीनामा हा भाजप मनपातील सत्तेतून बाहेर पडण्यासाठीचे पाऊल मानले जात असले तरी स्थायी समितीच्या सभापती तथा भाजपच्या सदस्या राजश्री कुलकर्णी यांनी मात्र अर्थसंकल्प मांडण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यामुळे भाजपकडून उपमहापौरपदाच्या राजीनामा नाटय़ाची खेळी ही एक ‘गनिमी कावा’ असे मानले जात असले तरी तो राज्याप्रमाणे औरंगाबादेतही फसल्याची चर्चा दुपारी तहकूब झालेल्या सभेनंतर महापौरांच्या दालनात सुरू होती. यावर  भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर म्हणाले, ‘ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शहराला अनेक प्रकारे आर्थिक मदत दिली. रस्ते, स्मार्ट सिटी यासाठी तर निधी दिलाच पण शहराच्या विकासासाठी महत्त्वाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्याला स्थगिती दिल्याने उपमहापौरांनी राजीनामा दिला आहे. सर्व नगरसेवकही विकासाच्या बाजूने असल्याने सर्वाची भावना अशीच आहे.’

सत्तेला आम्ही चिटकलेले नाहीत, आम्ही काही खिशात राजीनामा घेऊन फिरत नाहीत, अशा शब्दांत उपमहापौर विजय औताडे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना टोला लगावला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना मते दिलेली असतानाही सेना ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी करून राज्याच्या सत्तेत आली. ही युती राज्यातील जनतेला अमान्य आहे. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादसाठी १६८० कोटींची पाणीपुरवठय़ाची योजना मंजूर केली. त्यालाही स्थगिती देण्यात आल्याने राजीनाम्याचा निर्णय घेतला.

– विजय औताडे, उपमहापौर

आम्ही उपमहापौर औताडे यांना राजीनामा देण्यास सांगितले नाही. अद्याप भाजप सत्तेतूनही बाहेर पडलेली नाही. अर्थसंकल्पाची मांडणी स्थायी समितीच्या राजश्री कुलकर्णी यांनी केलेली आहे. त्यांनी मांडणी केली नसती किंवा त्यांनीही राजीनामा दिला असता तर भाजप सत्तेतून बाहेर पडली, असे म्हणण्यास वाव होता. मात्र तसे झाले नाही. भाजप सत्तेतून बाहेर पडले तरी शिवसेनेवर त्याचा परिणाम होणार नाही. आम्ही सत्तेचा सारा डोलारा सांभाळण्यास पूर्ण सक्षम आहोत.

– नंदकुमार घोडेले, महापौर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 4:14 am

Web Title: bjp out of power from aurangabad municipal corporation zws 70
Next Stories
1 मराठवाडय़ात जलयुक्त शिवारवर २३२४ कोटी खर्च
2 भुकेच्या समस्येमुळे ‘तिच्या’वर देहविक्रय करण्याची वेळ
3 युती तुटल्याचे औरंगाबाद महापालिकेत पडसाद
Just Now!
X