विनापरवाना डाळींचा साठा केलेले व्यापारी आता प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. शुक्रवारी जुना मोंढय़ातील डाळ व्यापाऱ्याचे दुकान सील करण्यात आले. या दुकानात १२६ क्विंटल डाळींचा साठा होता. दुकानदाराने तपासणी अधिकाऱ्यांना कोणतीही कागदपत्रे न दाखवल्याने ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे दुकान सील केल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली.
एम. बी. वाणी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी सकाळी जुना मोंढय़ात काही व्यापाऱ्यांच्या दुकानांची तपासणी केली. या वेळी संजयकुमार ग्यानचंद पाटणी यांच्या दुकानात विविध डाळी आढळून आल्या. डाळींच्या साठय़ाबाबत विचारणा केली असता, व्यापाऱ्याने कोणतीही कागदपत्रे दाखवली नाहीत. साठा करण्याचा परवानाही दाखवला नाही. त्यामुळे वाणी यांनी दुकान सील करून सर्व साठा जप्त केला व कारवाईची माहिती वरिष्ठांना दिली.
या कारवाईनंतर जुना मोंढा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह काही व्यापारी पुरवठा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले होते. परवाना घेण्याबाबतचे बंधन सरकारने रद्द केले आहे. साठा परवान्याची गरज राहिली नाही. तसेच अनेकांनी परवाना मिळावा, या साठी अन्नधान्य वितरण अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे शासकीय शुल्क भरून अर्जही केले आहेत. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाने परवाने काही दिले नाहीत. अनेकांनी अर्ज, चलनाच्या झेरॉक्स प्रतीही अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी सोबत आणल्या होत्या. प्रशासनाचे असेच धोरण राहिले, तर मोंढा बंद ठेवण्याचा इशारा संजय कांकरिया, देवेंद्र सेठ, रमेश मुथा, नीलेश सोमाणी, शंकर दायमा, प्रशांत सोकिया, प्रवीण कासलीवाल, हेमंत गंगवाल आदींनी दिला.
तीन दिवसांपासून शहर व जिल्ह्य़ात विविध तपासणी पथके नेमून डाळींच्या अवैध साठय़ाचा शोध घेतला जात आहे. गुरुवारी दसरा सण असतानाही प्रशासन डय़ूटीवर होते. सणाच्या दिवशीही २१ ठिकाणी छापे टाकून तपासणी करण्यात आली. मात्र, पथकांच्या हाती काही लागले नाही.
शहरासह जिल्ह्य़ात डाळींचा बेकायदा साठा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे. तिसऱ्या दिवशी पथकांची संख्याही वाढवण्यात आली. सध्या २१ पथके जिल्ह्य़ात विविध ठिकाणी तपासणी करीत आहेत. शुक्रवापर्यंत तपासणीत तूरडाळ ४२५ क्विंटल, मूगडाळ ४६३ क्विंटल, हरभरा डाळ ७२२ क्विंटल, उडीद डाळ ११३ क्विंटल आढळून आली. पथकांनी बेस्ट प्राइझ, प्रोझोन मॉलचीही तपासणी केली. मात्र, या ठिकाणी मर्यादेपेक्षा अधिकचा साठा आढळून आला नाही.
जुन्या मोंढय़ातील व्यापारी पाटणी यांच्या दुकानात १२६ क्विंटल डाळींचा साठा होता. खरेदीसंदर्भातील कागदपत्रे, परवाना आदींचीही पथकाद्वारे तपासणी केली जात आहे. शहर व जिल्ह्य़ातील घाऊक, अर्धघाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडे कायद्याने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक साठा नाही, या बाबत खात्री होत नाही तोपर्यंत तपासणी सुरूच राहील, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांनी स्पष्ट केले.
व्यापाऱ्यांनी शहर परिसर, तसेच ग्रामीण भागातील सरकारी आणि खासगी गोदामांमध्ये माल साठवून ठेवला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. २७) एकाच दिवशी एकाच वेळी जिल्ह्य़ातील ११ सरकारी गोदामांची तपासणी करण्यात येईल. या गोदामात कोणता माल ठेवला आहे, कोणत्या व्यापाऱ्यांनी ठेवला आहे आदी सर्व माहिती समोर येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी दिली. साठा परवाना, परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. मात्र, व्यापाऱ्यांना परवाने दिलेले नाहीत, या बाबत विचारले असता ‘अर्ज दाखल झाल्यानंतरही परवाने का देण्यात आले नाहीत, नूतनीकरण का झाले नाही याची कारणे तपासली जातील. बेकायदा डाळींचा साठा आढळल्यास तो जप्त केला जाईल’ असे त्यांनी सांगितले.