खासदार चंद्रकांत खैरे यांची मागणी
वाहन नोंदणी, लायसन्ससाठी दोन अतिरिक्त रहिवासी पुराव्याची अट लागू केल्याने नागरिकांना नोंदणी त्रासदायक होत आहे. ती अट रद्द करावी, असे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांना दिले. तसेच शेंद्रा एमआयडीसी येथे होणाऱ्या वाहनचालकांच्या चाचण्या सकाळी दहा ते पाच करण्याच्या सूचनाही दिल्या.
आरटीओ कार्यालयाच्या आवारातील स्वच्छता, पाìकग, स्वच्छतागृह या समस्यांकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा, करोडी येथील नव्या कार्यालयाच्या कामाचा आढावा घेत हे काम जलदगतीने व्हावे या संदर्भात परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त, परिवहन सचिव यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. अधिकारी, कर्मचारी संख्याबळ कमी असल्याने कामे खोळंबली असल्याचे अनेकदा वृत्तपत्रातून निदर्शनात आल्याचा मुद्दाही बठकीत उपस्थित झाला. त्यासंबंधी दाखल प्रस्तावाचा पाठपुरावा करू असेही ते म्हणाले. औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांचा प्रादेशिक परिवहन विभागात समावेश आहे. वाहन चालवण्याच्या परवान्यापासून ते वाहन पासिंगपर्यंतची सर्व कामे या कार्यालयातून होतात. हजारो नागरिक कामानिमित्त सकाळपासून गर्दी करतात. त्यामुळे शिबिर कार्यालयातच वाहन नोंदणी करण्यात यावी, अशा सूचनाही खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांना दिल्या.