23 November 2017

News Flash

समीर मेहतासह पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिनिधी, औरंगाबाद | Updated: September 4, 2017 2:15 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

११ लाखांची फसवणूक

बांधकाम व्यावसायिक समीर मेहता याच्यासह पत्नी मेघनाविरुद्ध सदनिका खरेदीच्या संदर्भाने दिलेली ११ लाखांची रक्कमही दिली नाही आणि सदनिकेचा ताबाही दिला नसून यातून फसवणूक झाली आहे, अशी तक्रार व्यापारी प्रवीण पारीख यांनी दिली आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहताविरोधात फसवणुकीचे दररोज एक-एक प्रकरण समोर येत असून शुक्रवारी औरंगाबादजवळील वडगाव कोल्हाटी येथील १८७ सदनिकाधारकांची प्रत्येकी ११ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी वाळूज औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शहरातील टिळकपथावरील पाटील हाऊस येथील व्यापारी प्रवीण नंदकुमार पारीख (वय ४२) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हिरापूर येथील आर.  के. फोर्थ डायमेंशन या गृह प्रकल्पाच्या इमारत क्रमांक १३ मधील टू बीएचकेची एक सदनिका क्रमांक ४ हा आपल्या व पत्नीच्या नावावर खरेदीपूर्व नोंदणी करण्यासाठी १३ लाख ७५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी ११ लाख ७२ हजार २८५ रुपये मेहता याच्या बाबा पेट्रोल पंपानजीकच्य भाग्यनगर येथील आर. के. काँन्स्ट्रो या कार्यालयात १९ जुलै २०११ ते ३० एप्रिल २०१७ या दरम्यान जाऊन दिले. करारनाम्याप्रमाणे १ नोव्हेंबर २०१४ पर्यंत बांधकाम होत असलेल्या सदनिकेचा ताबा द्यायचे ठरले होते. मात्र आरोपींनी सदनिकेसाठी घेतलेली रक्कमही दिली नाही. शिवाय सदनिकेचा ताबाही दिला नाही. या प्रकरणी प्रवीण पारीख यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात समीर मेहता व दोन अन्य महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव कोल्हाटी येथील अक्षय तृतीया फ्लॅट ओनर्स सहकारी गृहनिर्माण सोसायटी संस्था मर्यादितमधील सदनिकाधारकांची   फसवणूक केल्याची तक्रार विलास किसन जंजाळ (वय ४१) यांनी दिली आहे. ही फसवणूक २० लाख ५७ हजारांपर्यंतची असल्याचे मानले जात आहे. जंजाळ यांनी तक्रारीत म्हटले आहे की, गृहनिर्माण सोसायटीतील सदनिकाधारकांकडून वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने देत प्रत्येकाकडून ११ हजार रुपये करारपत्रक करून घेतले. त्यानंतर ठरलेल्या करारानुसार वीजपुरवठा, पाण्याची व्यवस्था, अशा प्रकारची दिलेली आश्वासने समीर मेहता याने दिली होती. मात्र, आश्वासनांची पूर्तता झाली नसून मेहता याने १८७ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

First Published on September 4, 2017 2:15 am

Web Title: cheating case against samir mehta and wife