गारखेडा परिसरातील उल्कानगरी येथील घटना

महिनाभरापूर्वी प्रसूत झालेल्या विवाहित महिलेचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एक महिन्याच्या बाळासह मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील उल्कानगरी भागात घडली.

रोहिणी राहुल भंडारी (वय ३०) हिचा विवाह वर्षभरापूर्वी राहुल भंडारी याच्यासोबत झाला होता.  रोहिणी माहेरी बाळंतपणासाठी आली होती. २५ फेब्रुवारी रोजी तिने बाळाला जन्म दिला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ती बाळाला घेऊन ऊन दाखविण्यासाठी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेली होती. इमारतीच्या कठडय़ाजवळ थांबून ती बाळाला ऊन दाखवत असताना अचानकपणे तिचा तोल जाऊन ती खाली कोसळली. गंभीर जखमी झालेल्या रोहिणी भंडारी व तिच्या बाळाला रोहिणीचा भाऊ अजय तातेड याने उपचारासाठी त्वरित खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रोहिणी व तिच्या बाळाचा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर हे करीत आहेत.