बिडकीन औद्योगिक पार्कचा ‘कन्सेप्ट प्लान’ तयार असून पुढील नियोजनासाठी सिंगापूर व कॅनडासह चार कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. येत्या १५ दिवसात एका कंपनीची निवड केली जाईल व त्यानंतर मास्टर प्लानची निविदाही महिनाभरात निघणार आहे. बिडकीन पार्कचा विकास तीन टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यातील एक हजार हेक्टरवरील विकासकामांची निविदा जुलैमध्ये काढण्यात येणार आहे. या कामासाठी केंद्र सरकारने ६०० कोटी रुपयांचा निधी दिला असून, जुलै महिन्यात उर्वरित निधी दिला जाईल. शेंद्रा औद्योगिक पार्कमध्ये १५ ते २० कंपन्यांनी रस दाखवला असून, त्यांची राज्य सरकारबरोबर बोलणीही सुरू झाली आहे. सप्टेंबरमध्ये उद्योगांना भूखंड वाटप केले जाईल, अशी माहिती औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडचे सहसरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी दिली.
शेंद्रा औद्योगिक पार्कमधील कामांची पाहणी केल्यानंतर येत्या दोन-तीन महिन्यात औरंगाबाद येथे मोठय़ा गुंतवणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे पाटील यांनी सांगितले. सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्टअंतर्गत येणाऱ्या प्रशासकीय इमारतीची निविदा मे महिन्यात निघणार असून, शेंद्रा येथील ८४६ हेक्टरवरील औद्योगिक पार्कच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे. या कामांचा आढावा गजानन पाटील व प्रादेशिक अधिकारी सोहम वाया, कार्यकारी अभियंता राजेंद्र गावडे यांनी घेतला.
शेंद्रा-बिडकीन औद्योगिक पार्कसाठी जागतिक कंपनीची प्रोग्राम मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे. शापूर्जी पालनजी ही कंपनी पायाभूत सुविधांची कामे करीत आहे. सध्या लाडगाव शिवारातील जमिनीचे सपाटीकरण व रस्त्यांसाठी दबाईचे काम सुरू आहे. पार्कमध्ये पाणीपुरवठय़ासाठी जलवाहिनीचे काम आधी हाती घेतले जाणार आहे.
कंत्राटदार कंपनीने शेंद्रा एमआयडीसीला लागून पार्किन्स कंपनीजवळ कार्यालय सुरू केले आहे. येथे ५०० वर कामगार काम करीत असून, तीन लेबर कॅम्प उभारण्याची तयारी सुरू आहे. जायकवाडीतून शेंद्रा-बिडकीन येथे पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीचे काम निम्म्यापेक्षा अधिक झाले आहे. पाईप उपलब्ध झाल्यानंतर उर्वरित कामाला वेग येईल. पहिल्या टप्प्यातील शेंद्रा-औद्योगिक पार्कसाठी १ हजार ५३३ कोटी निधीतून ६ प्रकारची कामे घेतली जात आहेत. पैकी दोन निविदांची कामे सुरू झाली आहेत. रस्ते व दोन रेल्वे उड्डाणपुलांची कामे हाती घेण्यात आली असून, शेंद्रा पार्कमध्ये २५० एकरवर लॅण्डस्पेकिंग केले जाणार आहे. यात पाझर तलावांचे सुशोभीकरण, उद्यान निर्मिती आणि परिसर सुशोभीकरणासाठी सल्लागार संस्था नेमली जाणार असून त्यासाठीच्या निविदा महिनाभरात पूर्ण होईल.
कॅनडा येथील आयबीआय कंपनीकडे माहिती-संवाद आणि तंत्रज्ञानातील काम देण्यात आले आहे.
नक्षत्रवाडी येथे महापालिका सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जमा होणाऱ्या पाण्यावर पुनप्रक्रिया केली जाणार असून तेच शुद्ध पाणी उद्योगांना पुरविले जाणार आहे. १०० दशलक्ष लिटरपेक्षा अधिक क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यासाठी सल्लागर संस्था नेमण्याचे काम जूनमध्ये पूर्ण होणार आहे. या कामी सिंगापूर सरकारची मदत घेतली जाणार आहे. सिंगापूर, जर्मनी व जपानमध्ये योजना राबवणाऱ्या कंपन्यांना निमंत्रित केले जाणार असून साधारणत: २०० कोटींचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे. संरक्षण क्षेत्रातील काही कंपन्यांनी औरंगाबाद येथे उद्योग सुरू करण्याचा विचार केला असून येथे गुतंवणूक वाढण्याची शक्यता आहे.