धर्मा पाटील या शेतकऱ्याची आत्महत्या, लाभार्थ्यांच्या यादीत एकमेव असणारे रामदेवबाबा, कीटकनाशक प्रकरणी मोघम स्वरूपाचा दाखल झालेला अहवाल, जाणीवपूर्वक मोडीत काढली जाणारी सहकार चळवळ असे विषय घेत काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेच्या तयारीसाठी मांडले जाणारे विषय नोटाबंदी आणि जीएसटी असतील, असे संकेत काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबिरामध्ये मंगळवारी देण्यात आले. यातील धर्मा पाटील प्रकरणाला राजकीय वळण देत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यापर्यंत भूसंपादनाचा धागा कसा गुंतला जातो, याची माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारवर हल्ला बोल केला. केंद्रीय नेतृत्वावर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका करत दोन्ही काँग्रेसने मराठवाडय़ात स्वतंत्रपणे संघटन बांधणी सुरू केली आहे. मात्र, त्यांच्यात आघाडी होईल की नाही, हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही. आघाडी होईलच, असे काही नाही या शब्दात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आघाडीची शक्यता नाकारली. त्याच वेळी आघाडी होऊही शकते, असेही ते म्हणाले. आघाडीच्या पातळीवर ‘होय’ही आणि ‘नाही’ही अशा दोलायमान अवस्थेत काँग्रेस पक्ष असल्याचे दिसून आले. ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या हल्ला बोल यात्रेच्या समारोपात राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, हे स्पष्ट होईल असे मानले जाते.

मराठा मोर्चे, त्यानंतर अगदी तालुकास्तरापर्यंत झालेले बहुजन एकत्रीकरणाचे मोर्चे यामुळे मराठवाडय़ातील माणूस प्रत्येक घटनेचा विचार आता जातीय अंगाने करू लागलेला असताना निवडणुकीच्या वातावरणात कोणते नेते काय भूमिका घेतात, यावर निवडणुकांचे निकाल अवलंबून असतील. मराठवाडय़ात २७ सभा घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने औरंगाबाद येथे हल्ला बोल यात्रेचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ठराविक कालावधीत जास्तीत जास्त सभा घेऊन वातावरण निर्मिती करण्याची रणनीती आखली होती. तर काँग्रेस नेते प्रत्येक जिल्ह्य़ात एकेक दिवस घालवून कार्यकर्त्यांपर्यंत विषय सांगण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेसच्या शिबिरात रत्नाकर महाजन यांनी ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने’ असा विषय मांडला. विरोधक अगदी एकटा जरी असेल, तरी त्याच्या मताचा आदर सत्ताधाऱ्यांनी करायचा असतो आणि यालाच लोकशाही म्हणतात, असे सांगत भाषणाची सुरुवात केली. बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांना अभय मिळत राहावे, अशी रचना करणे आवश्यक असते. मात्र, ‘प्रधान प्रचारक’ खोटय़ा प्रचाराशिवाय काहीच करत नाहीत, असे सांगत त्यांनी इतिहासातील दाखले देत भाजप सरकार दडपशाहीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थकारणातील अनागोंदी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केले. वसंत पुरके यांनी अनुसूचित जाती-जमाती, आदिवासींसाठी काँग्रेसने केलेले काम याची माहिती कार्यकर्त्यांना दिली. हर्षवर्धन पाटील सहकार चळवळीवर बोलले. प्रत्येकाने विषय वाटून घेतले होते. विशेष म्हणजे काँग्रेसचा एकही वक्ता विषय सोडून बोलला नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र प्रदेशाध्यक्षांना सल्ले दिले. अर्थात तेही सौम्य शब्दांत होते. ते म्हणाले, ‘आघाडी केली की अडचणी असतात. त्यामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांला कामाला लागण्याचे आदेश द्यायला हवेत. आघाडी होईल की नाही, हा तुमचा निर्णय होईल. आघाडी करण्याची भूमिका मी नाकारत नाही. पण प्रत्येक जिल्ह्य़ात कार्यकर्त्यांना कामाला लावले पाहिजे.’ विखेंचा हा सूर काँग्रेसमध्ये किती गांभीर्याने घेतला जाईल, याविषयी शंका असल्या तरी आघाडीचा निर्णय सबुरीने घेतला जाईल, असे संकेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिले. दोन दिवसांच्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय शक्ती आणि झालेला शक्तिपात याचाही आढावा घेण्यात आला. अशी शिबिरे आता प्रत्येक जिल्ह्य़ात घेतली जाणार आहेत. पालघर आणि जळगाव या दोन जिल्ह्य़ात शिबिरे घेतल्यानंतर मराठवाडय़ात पहिल्यांदाच पार पडलेल्या शिबिरात काँग्रेसमध्ये विषयाची मांडणी होते, असा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत गेला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र नेहमीच्या प्रचारसभांचाच धडाका मराठवाडाभर लावला. उस्मानाबाद, परभणी, जालना आणि बीड या चार जिल्ह्य़ांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बऱ्यापैकी प्रभाव असल्याने तेथे सभांना प्रतिसाद मिळणे स्वाभाविक होते. औरंगाबादच्या सभेस आणि मोर्चास कार्यकर्त्यांची गर्दी होईल. मात्र, त्यातून ते पक्षबांधणी कशी करतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. विरोधकांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला असला तरी सत्ताधारी भाजपकडूनही बांधणीच्या पातळीवर अगदी मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांची यादी करण्यापर्यंतचे काम सुरू झाले आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला नेत्यांकडून उत्तर देण्याऐवजी समाजमाध्यमातून विरोधकांनाच प्रश्न विचारले जातात. काँग्रेसलाही संघटना बांधणीसाठी काही जिल्हे अवघड आहेत. काही जिल्ह्य़ांचे सुभे आहेत. बीड जिल्ह्य़ात काँग्रेसचे तसे अस्तित्व नाहीच. तर लातूर हा स्वतंत्र सुभा आहे. तेथे आता भाजप पाय रोवत असल्यामुळे प्रदेश काँग्रेस लातूरमध्ये किती आणि कसे लक्ष घालणार, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. बीडसारख्या जिल्ह्य़ात पक्षाचे अस्तित्वच नाही. त्यासाठी काही पेरणी करणार का, असे प्रदेशाध्यक्षांना विचारले असता ते म्हणाले, आता मशागत सुरू आहे. बघू, काय उगवून येते. एका बाजूला शिबिरे आणि दुसऱ्या बाजूला सभांचा धडाका अशा वातावरणात काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठवाडा ढवळून काढला आहे.