औरंगाबाद शहरात करोनाचे रुग्ण वाढत असून मास्कचा वापर टाळणारे नागरिक, व्यापारी, फळविक्रेत्यांवर औरंगाबाद महानगरपालिकेचे पथक, माजी सैनिक व नागरिक मित्र पथकाकडून कारवाई केली जात आहे. पथक कारवाई करत असताना शिवसेनेच्या माजी आमदारासह तिघांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी, भाजपाचे माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांच्यासह तिघांवर सोमवारी रात्री ११ नंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात माजी सैनिक असलेले देवीदास लक्ष्मण सुसर यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सुरेंद्र माणिकराव कुलकर्णी (रा. उल्कानगरी), आतिश भगवानराव जोजारे (रा. दिवाण देवडी) यांना अटक करण्यात करून न्यायालयात उभे केले असता ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर माजी आमदार किशनचंद तनवाणी हे फरार असल्याचे क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपत दराडे यांनी सांगितले. सुसर यांच्या तक्रारीनुसार ते स्वत:, आबाराव राघव साळुंके, आत्माराम तुकाराम गवळी असे काही जण सोमवारी सायंकाळी गुलमंडी भागात मास्क न वापरणारे हातगाडीवाले, फळविक्रेते, नागरिकांवर कारवाई करत होते. महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात येत होती. मात्र, शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी, सुरेंद्र कुलकर्णी, आतिष जोजारे हे गुलमंडीवर आले व कारवाईस विरोध करू लागले. त्यांनी सुसर यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. शासकीय कामात अडथळा आणला, असे तक्रारीत म्हटले आहे.

या संदर्भात किशनचंद तनवाणी यांना विचारले असता ते म्हणाले, “मनपाचे पथक सर्वसामान्य माणसांवर अरेरावीची भाषा वापरते. गुलमंडीवर ८० ते ८५ टक्के लोक, हातगाडीवाले, व्यापारी मास्क वापरणारे आहेत. एखादा व्यापारी ग्राहक आल्यानंतर बोलण्यासाठी म्हणून मास्क तोंडाखाली ओढतो. मात्र, त्यावरही पथक कारवाई करते. सर्वसामान्य नागरिकांना पथक त्रास देते. त्यांनी रोषणगेट भागात जाऊन मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करावी. पथकाने आपल्या कार्यालयाच्या परिसरातील बांधकाम उद्ध्वस्त केले,” असेही तनवाणी सांगितले.