पीडित महिलेला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणात एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेले नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीद याचा अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. एम. देशपांडे यांनी फेटाळला. पीडित महिलेने १५ जानेवारी २०१९ रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्या आधारे सय्यद मतीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मतीन याने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्या नाराजीने सय्यद मतीन याने खंडपीठात धाव घेतली होती. तक्रारकर्तीचे आरोप खोटे असल्याचे याचिकाकर्त्यांने सुनावणीवेळी निदर्शनास आणून दिले. सुनावणीअंती खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळला. पीडितेतर्फे अ‍ॅड. माणिकराव वानखेडे यांनी काम पाहिले. त्यांना रुपेशकुमार बोरा व अ‍ॅड. एस. बी. पाईकराव यांनी सहकार्य केले.