राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतूक विभागाकडून वितरण

औरंगाबाद : शालेय पाठ्यपुस्तके पोहोचविण्यासाठी या वर्षी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाकडून राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतूक सेवेचा उपयोग केला जात असला, तरी वाहून नेण्याच्या बसच्या दहा टनाच्या क्षमतेमुळे नव्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पूर्वी मालमोटारीतून १६ किंवा २५ टनांपर्यंतची पुस्तके नेली जात. आता वजन मर्यादेमुळे पुस्तके पोहोचविण्याची गती काहीशी कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. करोना नसणाऱ्या गावात नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या महिनाअखेरपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचविण्यासाठी पाठ्यपुस्तक महामंडळाचे अधिकारी विशेष परिश्रम करीत आहेत. पण एरवीपेक्षा या प्रक्रियेस थोडा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.

या वर्षी १७ जुलै समग्र शिक्षा अभियानास सुरुवात झाली. औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्यांचा पाठ्यपुस्तक पुरवठा औरंगाबाद येथून केला जातो. साधारणत: ५२ लाख २२ हजार ३६५ पुस्तक प्रती पुरविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जालना जिल्ह्यास नक्की किती पाठ्यपुस्तके लागणार याची माहिती अद्याप एकत्रित झालेली नाही. त्यामुळे जालना जिल्ह्यात अद्याप पाठ्यपुस्तके पाठविण्यात आली नाही. आतापर्यंत औरंगाबाद महापालिका, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तसेच बीड जिल्ह्यातील पाठ्यपुस्तकांचा पुरवठाही तालुका स्तरापर्यंत करण्यात येत आहे. शिल्लक पुस्तकांचा साठा आणि नव्याने झालेले त्याचे मुद्रण लक्षात घेऊन पाठ्यपुस्तक वितरण सुरू झाले असले, तरी राज्य परिवहन महामंडळाच्या बसची वाहून नेण्याची क्षमता दहा टनांपर्यंत असल्याने पाठ्यपुस्तक वाहनांच्या फेऱ्या आणि मजूर वाढवावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

विभागीय पाठ्यपुस्तक मंडळातून वाहतूक ठेकेदार ठरवले जात नाहीत. त्यामुळे याबाबत आम्हाला फारशी माहिती नाही, असे अधिकारी सांगत असले, तरी वाहतूक  क्षमतेच्या मर्यादांमुळे या वर्षी पाठ्यपुस्तक पुरवठ्यात थोडासा विलंब होण्याची शक्यता आहे.