औरंगाबाद : मराठवाडय़ात प्राणवायू पुरवठय़ाची मागणी १६७ केएल एवढी असून त्याच्या पुरवठय़ाचे समीकरण अजूनही नाजूक स्थितीमध्ये आहे. दरम्यान, मराठवाडय़ातील रुग्णसंख्या आणि वाढती  प्राणवायूची मागणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सरकार दरबारी मांडली आहे. ती २२५ केएल पर्यंत असल्याची सांगण्यात येते. त्यातील काही प्राणवायू निर्माण करण्यासाठी परळी येथील विद्युत केंद्रातील प्राणवायूची केंद्रं परळी आणि परभणी येथे हलविण्यात येत आहेत. दरम्यान प्राणवायू वापराचे लेखापरीक्षण करण्याची मागणी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत केली.  मिळालेला प्राणवायू रुग्णांच्या निष्काळजीपणामुळे वाया तर जात नाही ना, तसेच होणाऱ्या पुरवठय़ात कोठे गळती तर नाही ना, याची खात्री करण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती  नेमण्यात यावी असेही आदेश देण्यात आले आहेत. येत्या काळात प्राणवायू पुरवठय़ासाठी ‘ऑक्सिजन कॉन्संट्रेटर’ची व्यवस्था केली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

औरंगाबाद महापालिकेने ५०० ‘ऑक्सिजन कॉन्संट्रेटर’ खरेदी करण्याचे ठरविले असून १०० यंत्रे मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान मिळणाऱ्या प्राणवायूचा वापर नीटेपणे होतो आहे ना, हे तपासणेही आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींची बैठक सोमवारी घेण्यात आली. या बैठकीमध्ये रुग्ण जेवण करताना तसेच अन्य कारणाने खाटेवरून उठून गेल्यानंतर प्राणवायू वाया तर जात नाही ना, याची खातरजमा करावी आणि त्या सूक्ष्म पातळीवर व्यवस्थापन करावे अशी मागणी आमदार दानवे यांनी केली आहे. या अनुषंगाने बोलताना भाजपाचे खासदार डॉ. कराड म्हणाले,की खासगी रुग्णालयांनी आता ‘ऑक्सिजनसाठी कॉन्सन्ट्रेटर’ घ्यावेत अशी सूचनाही करण्यात आली. तसेच गळती थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त आणि ग्रामीण भागासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी लक्ष घालावे, अशी सूचना करण्यात आली.  अधिक दाबाने रुग्णास प्राणवायू  देण्याची गरज आहे का, याविषयी वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्येही मतमतांतरे आहेत.  ‘हाय फ्लो’ प्राणवायू पुरवठा सर्व रुग्णांना आवश्यक नसतो असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान प्राणवायू वापरावर देखरेखीबरोबरच रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा आणि त्याला उपलब्ध असणारे पर्याय यावरही सोमवारच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा देयके लावत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी  प्रत्येक खासगी रुग्णालयात लेखापरीक्षक नेमण्यात यावेत असेही या बैठकीत ठरविण्यात आले. खासगी रुग्णालयांनी ‘बायपॅप यंत्र’ किंवा ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

दरम्यान, प्राणवायू पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी केली जाणारी चर्चा आणि नव्याने होणारे प्राणवायू निर्मितीचे प्रकल्प यामुळे परिस्थिती नियंत्रणात असली तरी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर पुरवठा यावर प्रशासकीय पातळीवरून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान रेमडेसिविर इंजेक्शनचे औषधी मागणीचे पत्र रुग्णांच्या नातेवाइकांच्या हातात न देता रुग्णालयांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच त्यांची मागणी करावी अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली.