डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील पिस्टल सीबीआय आणि एटीएसने जप्त केल्याचा दावा करुन संशयित तिघांना अटक केली आहे. याप्रकरणातील संशयित तिघांकडून हत्येत वापरण्यात आलेले गावठी पिस्टलसह एक एअर पिस्टल, तीन जीवंत काडतुस, तलवार आणि कुकरी अशी हत्यारे देखील जप्त करण्यात आली आहेत. शुभम सुर्यकांत सुरळे (२३), अजिंक्य शशिकांत सुरळे (१८, दोघेही रा. औरंगपुरा) आणि रोहित राजेश रेगे (२२, रा. विघ्नहर्ता बिल्डिंग, धावणी मोहल्ला, श्रीमंत गल्ली) अशी अटकेतील संशयित तिघांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी पाच वर्षे पुर्ण झाली. याकाळातच सीबीआय आणि एटीएसने राज्यभरात छापेमारी सुरु केली. या छापेमारीत एटीएसने सुरुवातीला सचिन प्रकाशराव अंदुरे याला अटक केली. यानंतर त्याचे सख्खे चुलत मेव्हणे शुभम व अजिंक्य यांच्यासह त्यांचा मित्र रोहित यालाही शस्त्रांसह अटक केली आहे. सीबीआयच्या कोठडीत अंदुरेने एक पिस्टल आपण १५ ते २० दिवसांपुर्वी मेव्हणा शुमम याच्याकडे सुरक्षित लपवून ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले होते. त्यावरुन २१ ऑगस्ट रोजी छापा मारत एटीएस आणि सीबीआयने रेगेच्या घरातून शस्त्र जप्त केली. याप्रकरणी तिघांविरुध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना २२ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

दरम्यान, संशयित तिघांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २७ ऑगस्टपर्यंत वाढीव कोठडी सुनावली आहे. या संशयित तिघांचा शस्त्रे बाळगण्यामागचा नेमका काय उद्देश होता. त्यांच्याकडे आणखी शस्त्रे आहेत का ? असतील तर ती कोठे लपवून ठेवली आहेत. त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का ? या शस्त्रांचा यापुर्वी समाजविघातक कृत्यांसाठी वापर केला आहे का ? भविष्यात शस्त्रांचा कोठे वापर करणार होते असे मुद्दे न्यायालयासमोर मांडण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. योगेश तुपे पाटील यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.