औरंगाबाद शहरातून वाहून जाणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सिंगापूर सरकारने हात पुढे केला असून शहरातून दररोज वाहून जाणाऱ्या १५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. या अनुषंगाने आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यास ८० टक्के रक्कम सिंगापूर सरकार खर्च करणार असल्याची माहिती उद्योग प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिली.
शहरातील पाण्याच्या कमतरतेवर उपाययोजना करता यावी, म्हणून पाण्याचा पुनर्वापराचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. पाण्याचा पुनर्वापर केल्यास डीएमआयसीत येणाऱ्या सर्व उद्योगांना सहज पाणीपुरवठा करता येईल. पाण्याच्या पुनर्वापराचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सिंगापूर सरकारशी करार झाला असून तीन वर्षांपर्यंत तंत्रज्ञानाची मदत सिंगापूर सरकार करेल. यात महापालिका व एमआयडीसी अधिकाऱ्यांची क्षमता बांधणी आणि पुनर्वापरासाठी आवश्यक प्रशिक्षणाचाही सहभाग असणार आहे. शहरातील पाण्याच्या पुनर्वापराच्या अनुषंगाने इस्रायल सरकारनेही हात पुढे केला होता. मात्र, सिंगापूरबरोबर एक करार झाला असून आणखी काही दिवसांनी त्याचा दुसरा टप्पाही करार रूपाने पूर्ण केला जाईल, असे अपूर्व चंद्रा म्हणाले.