मराठवाडय़ात निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत शेतकरी कामगार पक्षातर्फे शुक्रवारी काढलेल्या दुष्काळ प्रश्नावरील मोर्चातील गर्दीमुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळासमोर तब्बल ९४ कोटी रुपयांची तातडीची गरज असल्याचे प्रशासनाने मान्य केले. विभागीय आयुक्तालयात तावातावाने बोलत जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बऱ्याच वर्षांनी दुष्काळ प्रश्नावर शेकापने मोर्चा काढला. पाणीटंचाई व इतर प्रश्नी शेकापच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
दुपारी दोनच्या सुमारास शेकापच्या मोर्चासाठी गावागावांतून कार्यकत्रे जमले. विशेषत: उस्मानाबादमधील तुळजापूर व बीड जिल्ह्यांतून वाहनाने कार्यकत्रे आले. डोक्यावर लाल टोप्या व याच रंगाचे झेंडे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी हातात मागण्यांचे फलक घेतले होते. मोर्चात कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. या वेळी बोलताना आमदार पाटील यांनी, हे सरकार दुष्काळप्रश्नी असंवेदनशील असल्याचा आरोप केला. वसतिगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मोफत भोजनाची सोय करावी, मराठवाडय़ाला हक्काचे पाणी द्यावे, यासह अनेक मागण्या त्यांनी केल्या.
मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार काहीच काम करत नसल्याने त्यांच्या विरोधात या पुढे आक्रमक आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला. तत्पूर्वी आयुक्तालयात निवेदन देण्यास आलेल्या आ. पाटील यांनी राजशिष्टाचारावरुन बराच आरडाओरडा केला. हळू आवाजात म्हणणे मांडावे, असे सुचविणाऱ्याला माझा आवाजच मोठा असल्याचे सांगत ते कर्मचाऱ्यावर डाफरले. आयुक्त हजर का नाहीत, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा दौरा लातूर येथे असल्याने ते तिकडे गेले असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
तत्पूर्वी आयुक्तालयातील शिपाई शिष्टमंडळ गेल्यानंतरही उठला नाही, असे सांगत त्यांनी उपायुक्तांना धारेवर धरले. पाणीटंचाईसाठी किती रक्कम शिल्लक आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यावर टँकरसाठी ४४ कोटींची मागणी केल्याचे सांगण्यात आले. तसेच चाऱ्यासाठीही ५० कोटींची मागणी केल्याचेही अधिकारी म्हणाले. त्यावरुन सरकार निधी का देत नाही, असा सवाल त्यांनी केला.
औरंगाबाद शहराजवळील तिसगाव येथे पाणीटंचाई जाणवत आहे, तरीदेखील टँकर दिला जात नसल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. आमदार धर्यशील पाटील, पंडित पाटील, माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील, माजी आमदार ब्रिगेडिअर सुधीर सांवत, भाकपचे राम बाहेती, जयाजी सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. काँग्रेस व राष्ट्रवादीपेक्षाही शेकापचा मोर्चा अधिक मोठा असल्याचे दिसून आले.