पाच ते दहा टक्क्यांपर्यंत दर वधारले

औरंगाबाद : पावसाळ्यात आजारपण घरा-घरात पोहोचलेले असतानाच प्रतिजैविक औषधांच्या किमतीत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर खासगी रुग्णालयांमधून विक्री होणाऱ्या औषधांच्या किमतीवरही नियंत्रण राहिलेले नसून त्याचा फटका आजारपणाचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना बसत आहे.

औरंगाबादेत सध्या डेंग्यूसदृश ताप, मलेरियासह सर्दी-तापेच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. डेंग्यूसदृश तापाचे ग्रामीण भागात चार बळी गेले आहेत. आणखीही काही रुग्ण रुग्णालयात दाखल झालेले आहेत. सर्दी-तापेचे तर घरोघरी रुग्ण वाढत आहेत. सर्दी-तापाच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या सिनॅरिस्ट या गोळीच्या किंमतीत जवळपास दुप्पटीने वाढ झालेली आहे. अडीच रुपयांना मिळणाऱ्या एका गोळीसाठी आता थेट पाच रुपये मोजावे लागत आहेत. सिप्रॅझोन, फेब्रिक प्लस, विकोरिल, मेनोप्युनॉन, सिपॅक्झोनसारख्या औषधांच्या किमतीतही पाच ते दहा टक्के वाढ झाली आहे.

एकीकडे सर्दी-तापाच्या रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या औषधांच्या किमतीत वाढ झालेली असली तरी दुसरीकडे कर्करोग, रक्तदाब, मधुमेह, क्षयरोगासारख्या दीर्घकाळ सामना कराव्या लागणाऱ्या औषधांच्या किमतीत मात्र काही प्रमाणात घट झाली असल्याचे औषध दुकानदार सांगत आहेत.

रुग्णालयातील किमती अनियंत्रित

खासगी रुग्णालयांमध्ये काही औषधांच्या किमतीवर मात्र नियंत्रण नसल्याचे काही ठोक औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे. खासगी रुग्णालयांमधील औषधी दुकानांमध्ये सर्वसामान्य ग्राहकांकडून अपेक्षित नफ्यापेक्षा अधिकची रक्कम घेतली जात आहे. साधारण ठोक औषधी विक्रेत्यांना दहा टक्के नफा तर किरकोळ दराने औषधी विक्री करणाऱ्या दुकानदारांनी २० टक्के नफा घेणे अपेक्षित आहे. मात्र त्यापेक्षा अधिकच्या दराने औषधी विक्री केली जात आहे. त्यावर नियंत्रण आणणे अपेक्षित आहे, असे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या काही औषधांच्या किमतीत किरकोळ वाढ झाली आहे. औषधी तयार करणाऱ्या कंपन्यांना आवश्यक तो तयार माल जादा किमतीत खरेदी करावा लागत असेल तरच किमतीत वाढ होते.

– विनोद लव्हाडे, सचिव, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन