शैक्षणिक संस्थेविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद : संकेतस्थळावर शैक्षणिक संस्थेकडून चालवण्यात येणारे अभ्यासक्रम हे  शासनमान्य असल्याची खोटी जाहिरातबाजी करून विद्यार्थ्यांना चक्क पदविकांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्याने काढलेल्या माहितीतून पुढे आला असून या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित संस्थेविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगस पदविका देणाऱ्या या दोन्ही शैक्षणिक संस्था शहरातील शहागंज  भागातील असून मराठवाडा बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन एक्झामिनेशन आणि मॉडर्न टेक्निकल इन्स्टिटय़ूट अशी त्यांची नावे आहेत. या संस्थेच्या संचालक, अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मानवी हक्क संरक्षण जागृती या पुण्यातील सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अभिषेक सुभाष हरदास यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार हे समाजातील विविध कायद्याविषयी जनजागृती करण्याचे काम करतात. अनेक शैक्षणिक संस्थांकडून शिक्षण शिखर संस्थांची मान्यता न घेता विविध विषयातील पदवी-पदविका अभ्यासक्रमाच्या पदव्या दिल्या जात असल्याची माहिती त्यांना इंटरनेटवरून मिळाली होती. त्यावरून त्यांनी उच्च शिक्षण विभाग व तंत्र शिक्षण विभाग तसेच पोलीस दलाला माहिती दिली. अशातच त्यांना मराठवाडा बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन एक्झामिनेशन संस्थेची इंटरनेटवर माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी अधिक माहिती घेतली असता या संस्थेकडून संगणक विज्ञान, इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध अभियांत्रिकी शाखेतील पदविका देत असल्याचे तसेच पॅरामेडिकल, अ‍ॅग्रीकल्चर, हॉटेल मॅनेजमेंट, हेल्थ या अभ्यासक्रमाच्याही पदविका दिल्या जात असल्याचे संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर नमूद माहितीवरून कळाले. संकेतस्थळावर संस्थेचे उपरोक्त अभ्यासक्रम शासनमान्य असल्याचेही नमूद करण्यात आले होते. त्यामुळे डॉ. हरदास यांनी शासनमान्य असलेल्या संस्थांच्या यादीत या संस्थेचे नाव तपासले. तेव्हा ही संस्था शासनमान्य नसल्याचे त्यांना समजले. त्याची अधिक माहिती घेतली असता या संस्थेने अनेक शिक्षण संस्थांना स्वत:ची संलग्नता प्रदान केली आहे. या संस्थेतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन अभ्यासक्रमाच्या पदविका स्वत:च्या नावाने देत असल्याचेही संकेतस्थळावरून समजले. त्यामुळे या संस्थेविषयी डॉ. हरिदास यांना शंका आली. त्यांनी याबाबत तंत्र शिक्षण संचालक यांना फोनद्वारे कळवत या संस्था फसवणूक करत असल्याचे सांगितले.

तंत्र शिक्षणकडून चौकशी समिती गठीत

संबंधित संस्थेकडून देण्यात येणाऱ्या बोगस पदविका, अभ्यासक्रमाची प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत चौकशी समिती गठीत करण्यात आली. समितीने चौकशी करून या संस्थेने कोणत्याही प्राधिकरणाची मान्यता घेतली नसल्याचा निष्कर्ष दिला. संस्थेमार्फत सुरूअसलेले अभ्यासक्रम व पदविकांचे वाटप तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले.

पदविका, अभ्यासक्रमांसाठी शुल्क

मेकॅनिकल इंजिनीयिरगसाठी ४० हजार ३५० रुपये, संगणक विज्ञानासाठी २८ हजार ५० रुपये, कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनसाठी १८ हजार ५० रुपये भरायला तक्रारदाराला सांगितल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.