शिवसेना नगरसेवकाच्या हर्सूल भागातील (चौका) घरातच अभियांत्रिकीच्या स्थापत्य शाखेचा अवघड गेलेला पेपर पुन्हा सोडवताना रंगेहात अटक केलेल्या २४ विद्यार्थी, संचालक आणि नगरसेवकाला आज कोर्टात हजर करण्यात आले. यातील तीन विद्यार्थ्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर उर्वरित विद्यार्थी, संचालक, प्राध्यापक आणि नगरसेवकाला २३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईनंतर साई अभियांत्रिकी महाविद्यालय चालवणाऱ्या संस्थाचालकांसह काही पदाधिकारी, प्राचार्य, परीक्षा केंद्र प्रमुख, प्राध्यापक व २४ विद्यार्थी व तीन विद्यार्थिनींना ताब्यात घेतले होते. बुधवारी सायंकाळपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. साई अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून काही रक्कम घेऊन पुन्हा पेपर सोडवण्यास देते किंवा बनावट विद्यार्थी उपलब्ध करून देत असल्याची माहिती समोर आली होती.