संख्येत ६० टक्क्यांची घट; निसर्ग अभ्यासकांना चिंता

औरंगाबाद : शेत-शिवारांचे पठार ते अगदी घराच्या परसबागेतील कुंडीतील फुलांवर अलगदपणे मधुकणांसाठी विहरणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरांचे दर्शन गेल्या काही वर्षांमध्ये कमी होऊ लागले आहे. ग्रामीण भागात पिकांवर होणाऱ्या कीटकनाशकांच्या फवारणीचा त्यांच्या अस्तित्वावर परिणाम झाल्याचे निसर्ग अभ्यासकांकडून सांगितले जात असून फुलपाखरांच्या संख्येत ६० टक्क्यांनी घट झाल्याची भीती आहे.

वनस्पतीच्या फूल-फळांच्या अवस्था प्रक्रियेत परागकण आणि परागीभवन निर्मितीच्या साखळीत फुलपाखरू हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र आज मानवी कारणांमुळे सर्वच शहर आणि ग्रामीण भागामध्ये झाडे आणि वनस्पतींवरून विविधरंगी फुलपाखरांची संख्या नगण्य दिसत आहे.

फुलपाखरे ही त्यांना असलेल्या सोंडीद्वारे एका फुलावरून दुसऱ्या फुलापर्यंत जात आतला मध शोधून घेतात. या प्रक्रियेत नकळतपणे फुलांमधील सूक्ष्म परागकणांचा त्यांच्या पंखांना, पायांना स्पर्श होतो. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर हे दोन प्रकारचे परागकण असतात. या दोघांचे फुलपाखरांमुळे मीलन होते. त्याचे परागीभवन होते. त्यातून फुलाची एक अवस्था पूर्ण होते. विविध रंग हे पुंकेसर, स्त्रीकेसर एकत्र आल्याने तयार होतात. त्यातून झाडांचा वंश वाढीस लागतो. या प्रक्रियेस पुढे नेणाऱ्या फुलपाखरांची संख्या कमी होणे अत्यंत भयावह असल्याचे निसर्ग अभ्यासक मानत आहेत.

वैशिष्टय़े..

कीटक वर्गात मोडणाऱ्या फुलपाखरांचे भारतात सुमारे दीड हजार प्रकार सापडतात, तर महाराष्ट्रात २५० प्रजाती आढळतात. अंडी, सुरवंट, कोष व फुलपाखरू अशा त्यांच्या चार अवस्था असतात. बोटाच्या नखापासून ते हाताच्या पंजापर्यंतच्या आकारात फुलपाखरे सापडतात. फुलपाखरे ही दिवसा भ्रमण करतात तर पतंग रात्री उडतो. निसर्गात सौंदर्यमूल्य प्राप्त झालेल्या फुलपाखरांचे कोळी, माश्या, पक्षी, कीटक, सरडे यांना शत्रू मानले गेले आहे.

भीती काय?

निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेली फुलपाखरे ही पूर्वी पावसाळ्यात टाकळ, दुधी, रुई, तरवड, खैर, पाडळ, कुर्डू या वनस्पतींवर विहार करताना दिसायची. आता या वनस्पतींवर कुऱ्हाड चालवली जात आहे. तर शेतातील पिकांवर रासायनिक औषधांचा मारा होतो आहे. त्याचा परिणाम फुलपाखरांच्या अस्तित्वावर होऊ लागला. गेल्या वीस वर्षांत ६० टक्क्यांनी फुलपाखरांची संख्या घटली असल्याचे निसर्ग, पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले.