18 January 2021

News Flash

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मक्याच्या दरात घसरण

बर्ड फ्लूचे सावट; दरात शंभर रुपयांनी घट

(संग्रहित छायाचित्र)

बिपीन देशपांडे

बर्ड फ्लू आजाराचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या व्यवहारावरही उमटू लागले आहेत. विशेषत: निर्यातक्षम मक्याच्या खरेदी-विक्रीवर त्याचे परिणाम होत असून दरांमध्ये क्विंटलमागे शंभर रुपयांची घसरण झाली आहे.

देशपातळीवर पशुखाद्यासह अल्कोहोल, स्टार्च निर्मितीतील कंपन्यांकडून होणाऱ्या खरेदीचे दरही क्विंटलमागे दोनशे ते अडीचशे रुपयांनी खाली आले आहेत. पुढील सहा महिने बर्ड फ्लूचा प्रभाव राहणार असल्याने घसरलेल्या दराबाबत परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत नसल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.

मका उत्पादनात भारत अग्रेसर असून त्यातही महाराष्ट्रात अधिक पीक घेतले जाते. उत्पादनामुळे मक्याची निर्यात भारतातून अधिक होत असल्यामुळे दरात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगलीच तेजी असते. औरंगाबाद येथून व्हिएतनाम येथे मका निर्यात केला जातो. साधारण सोळाशे रुपये क्विंटलने निर्यातक्षम एफएक्यू (फेअर अ‍ॅव्हरेज क्वालिटी) प्रतीचा मका पाठवला जातो. मात्र, सध्या बर्ड फ्लूमुळे मक्याला क्विंटलमागे पंधराशे रुपयांनी दर मिळत आहे, असे औरंगाबाद येथील जाधववाडी उच्चतम कृषी बाजार समितीतील अडत असोसिएशनचे अध्यक्ष कन्हय्यालाल जैस्वाल यांनी सांगितले.

कुक्कुटपालन व्यवसायातील कंपन्यांकडून मक्याची होणारी खरेदीही मंदावली आहे. त्यामुळे दर दोनशे ते अडीचशे रुपयांनी खाली आले आहेत. या कंपन्यांकडून साडे तेराशे ते चौदाशे रुपये क्विंटलने मका मागितला जात आहे. पूर्वी त्यांनाही पंधराशे, साडे पंधराशे ते सोळाशे रुपयांनी विक्री केला जायचा. औरंगाबाद जिल्ह्य़ातील मक्याला अहमदाबाद, सुरतसह देशातील विविध विभागातून मागणी असते. विशेषत कपडय़ांना स्टार्च करण्यासाठी भुकटी निर्मिती करणाऱ्या अहमदाबादमधील कंपन्यांकडून मका खरेदी केला जाते. सोयाबीन पेंडमध्येही मक्याचे मिश्रण असते. अल्कोहोल निर्मिती, पशुखाद्य निर्मितीतील पुणे, बारामती, अहमदनगरमधील कंपन्यांकडून होणारी खरेदीही मंदावली असल्याचे जाधववाडी बाजार समितीतील मका खरेदी-विक्रीतील व्यापारी दत्तात्रय आष्टीकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:23 am

Web Title: falling corn prices in the international market abn 97
Next Stories
1 नवोक्रम आणि उद्योजक घडविण्यासाठी ‘मॅजिक’चे बळ
2 जलयुक्त गैरव्यवहारातील प्रकरणांचे चौकशीसाठी वर्गीकरण
3 राज्यात वस्तू व सेवा कराची तूट ४४२ कोटी
Just Now!
X