दुष्काळामुळे शेतीचे चित्र धूसर बनल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबून शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असल्याचे लोण मराठवाडय़ात कायम असून, औरंगाबाद तालुक्यातील पिंप्री राजा येथील तरुण दलित शेतकरी काकासाहेब कचरू पारखे यांनी कर्जबाजारीपणातून तीन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना वाचवण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. रविवारी त्यांचा मृत्यू झाला.
पारखे यांच्या जमिनीवर सेंट्रल बँक, बचत गट, तसेच आंध्रच्या आन्ना लोकांचे सावकारी कर्ज होते, मात्र त्याचा भार असहय़ होऊन हे कर्ज फेडणे पारखे यांच्या कुवतीपलीकडचे झाले होते. सावकारांनी त्यांच्यामागे वसुलीचा तगादा लावला होता. इकडे बँकेची नोटीसही आली होती. त्यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या पारखे यांनी विषारी औषध घेऊन मृत्यूला जवळ केले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.