औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतमध्ये भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलालाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये बँकेतील किती प्रमाणात नुकसान झाले आहे याची माहिती मिळू शकलेले नाही. मात्र,  बँकेतील कागदपत्रे जळून खाक झाली असावीत, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अदांज वर्तविण्यात आला आहे.

सकाळी बँक बंद असताना अचानक आग लागली. सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर अग्नीशमनदलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन दलाचा एक बंब आणि एक खासगी टॅंकर घटना स्थळी दाखल झाला.  तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर जवानांनी ही आग आटोक्यात आणली. सकाळच्या वेळेत आग लागल्यामुळे इमारतीमध्ये कोणीही नव्हते. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट तयार झाले होते.