‘जय श्रीराम’ म्हणायला लावणाऱ्या घटनेचे परिणाम

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात रविवारी रात्री फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणांचा इतरांसोबत झालेल्या वादाला धार्मिक रंग मिळाला. पोलीस तक्रारही करण्यात आली. या घटनेचे परिणाम शहरभर उमटू लागले असून फूड डिलिव्हरी करणारे सुमारे दोन हजारांवर तरुणांमध्ये सध्या भीतीचे सावट पसरले आहे. पोलिसांकडूनही आता या क्षेत्रात कोण काम करतो आहे आणि त्यांची पाश्र्वभूमी काय, याची माहिती मागवण्यात येणार आहे.

फूड डिलिव्हरीचे काम करणारा मोहसीन सांगत होता, आमच्याकडून मागवण्यात येणारे जेवण शहरातील कोणत्याही गल्लीतील घरात पोहोचवले जाते. ते काम आम्ही निर्भिडपणे करीत होतो. पण रविवारी शेख अमेर शेख अकबर या फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाला आझाद चौकात रात्री दमदाटी करण्यात आली. त्याच्याकडून ‘जय श्रीराम’ म्हणवून घेण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आता आमच्यामध्ये एखाद्या समुदायाच्या भागात रात्री जाऊन जेवण पोहोचवण्याबाबत नाहक अघटित घडणार तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.

सिडको भागातील आझाद चौकात रविवारी रात्री शेख अमेर व त्याचा एक मित्र फूड डिलिव्हरीच्या कामासाठी जात असताना रस्त्यामध्ये त्यांचा एका मोटारीला धक्का लागल्यावरून चौघांशी वाद झाला होता. या घटनेला धार्मिक रंग मिळाला आणि वाद ठाण्यापर्यंत पोहोचला. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला. दोन समुदायांमध्ये नाहक परस्परांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर पोलिसांनी रात्री नाकाबंदी करून हॉटेल, दुकाने आदी व्यवसाय ११ नंतर बंद करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणांची माहितीही घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या तरुणांना वाहन चालवण्याचा परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी कागदपत्रांवर काम मिळते. त्यात आता या तरुणांना आपण कुठल्याही गुन्ह्यमध्ये सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते का, अशी नाहक भीतीही वाटू लागली आहे.

बेरोजगारीमुळे सांप्रदायिकतेचे विचार

रविवारी रात्री दोन समुदायातील तरुणांमध्ये रस्त्यात वाहनाला धक्का लागून झालेल्या वादाला धार्मिक रंग देण्यासारख्या प्रकाराला बेरोजगारीचेही एक कारण असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये कट्टर धार्मिकतेचे विचार रुजत असल्याचे प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले.

फूड डिलिव्हरीच्या कामात दोन हजारांवर तरुण

शहरात मागील वर्ष-सहा महिन्यांत फूड डिलिव्हरीचा व्यवसाय तेजीत चालला आहे. कॉल सेंटर बंद पडल्यानंतर मोठय़ा संख्येने तरुण या कामात आले आहेत. त्यात अनेक विद्यार्थी असून सकाळी महाविद्यालय, तर सायंकाळी हॉटेलमधून जेवण पोहोचवण्याचे काम करतात. अर्ध-वेळ आणि पूर्णवेळ काम करणाऱ्या अशा तरुणांची संख्या शहरात दोन हजारांवर आहे.