वांगी येथे हरिनाम सप्ताहाचा महाप्रसाद खाल्ल्यानंतर सायंकाळी भाविकांना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाल्याने विषबाधा झाल्याचे समोर आले. अवघ्या काही तासांत आठशेपेक्षा जास्त रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी जागाही अपुऱ्या पडल्या. मात्र शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि खासगी डॉक्टर, सामाजिक संघटना व पोलीस यंत्रणेने मदतीचा हात पुढे करत रुग्णांना धन्वंतरी सभागृह व मोकळ्या जागेत उपचार दिले. शुक्रवारी बहुतांशी रुग्णांना घरी पाठवण्यात आले असून प्रसादाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

बीड तालुक्यातील वांगी येथे हरिनाम सप्ताहाचा समारोप १८ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता झाल्यानंतर जवळपास अडीच हजार भाविकांनी वरण, चपातीचा महाप्रसाद घेतला. वांगीसह शिवणी, इमामपूर, काठोडा या गावातील भाविक मोठय़ा संख्येने या सप्ताहात सहभागी झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा, सामाजिक संघटनांचे कार्यकत्रे रुग्णालयात दाखल झाले. सार्वजनिक माध्यमातून विषबाधेचे वृत्त शहरात समजल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन उपचारासाठी मदत केली. धन्वंतरी सभागृह व मोकळ्या जागेत रुग्णांवर उपचार करून शुक्रवारी सकाळी घरी पाठवण्यात आले. केवळ तीस ते चाळीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलीस व अन्न प्रशासन विभागाने महाप्रसादाचे नमुने ताब्यात घेतले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुम्रे, दीक्षितकुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे आणि राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी रुग्णालयात भेट दिली.