कार्तिक पौर्णिमेनिमित्त कपीलधार येथे मन्मथ स्वामी यांच्या समाधी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या अॅपेरिक्षाला समोरून येणाऱ्या मालमोटारीने धडक दिल्याने रिक्षातील ४ भाविक ठार, तर नऊजण गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.
बीड तालुक्यातील कपीलधार येथे मन्मथ स्वामी यांच्या समाधीस्थळी काíतक पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरते. या साठी नांदेड जिल्ह्यातील वाकरट बोरी (तालुका कंधार) येथील १३ भाविक प्रवासी अॅपेरिक्षातून (एमएच २६ के १६२५) बीडमाग्रे कपीलधारकडे निघाले होते. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास आहेरवडगाव फाटय़ाजवळ समोरून येणाऱ्या मालमोटारीने (एमएच ३१ डब्ल्यू ४०२३) अॅपेरिक्षाला धडक दिली. यात रिक्षामधील शंकर गुरपतअप्पा मठपती (वय ४५), अस्मता बाबू स्वामी (वय ५०), महादाबाई बालाजी झुंबाड (वय ४०) व सुलोचनाबाई नागनाथ गुळमे (वय ५२) जागीच ठार झाले, तर गोिवद शंकर मंगे, गोकर्ण गोिवद मंगे, लक्ष्मी बाबू पांचाळ, गोदाबाई नागोराव आष्टुरे, नागोराव शंकरराव आष्टुरे, मीराबाई शंकर चांदोळकर, बालाजी सदाशिव कापसे, महानंदा आष्टुरे, संभाजी तानाजी नातापल्ले हे जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. माहिती कळताच शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.