दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ासाठी संपादित केलेल्या जागांवर औरंगाबादमध्ये उद्योग उभारणीची चाचपणी करण्याच्या हेतूने जर्मनी आणि इटली येथील कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नुकतीच पाहणी केली. त्यांना लागणारी जागा, वीज या बाबतची माहिती त्यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे नोंदवली.
ईएसी-युरो एशिया कन्सलटिंग प्रा. लि. या कंपनीच्या अधिकाऱ्याने ११ मार्चला शेंद्रा औद्योगिक वसाहतीची पाहणी केली. ब्लेडस् बनविणाऱ्या या कंपनीला ४० एकर जागेची आवश्यकता आहे. सात हजार किलोव्ॉट ऊर्जा प्रकल्पाला लागू शकते, असा अंदाज या कंपनीने नोंदवला. मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
केवळ जर्मन कंपनीच नाही, तर ९ मार्चला इटलीच्या ऑक्टेगॉन या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेंद्रा आणि वाळूज या दोन्ही औद्योगिक वसाहतींची पाहणी केली. सौरऊर्जेसाठी लागणाऱ्या काळ्या शीट तयार करण्याचा कारखाना टाकता येऊ शकतो का, हे त्यांनी तपासले आहे. त्यांनी अडीच एकर जमिनीची मागणी केली असून साधारण ३८ ते ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या काही दिवसांत गुंतवणुकीस इच्छुक असणाऱ्या अनेकांनी विचारणा सुरू केली आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ातील जमीन संपादनानंतर तेथे उद्योग टाकण्यास इच्छूक असणाऱ्यांची यादी संकेतस्थळावर नोंदवली जात असून यात सुमारे ६०० उद्योजकांनी रस दाखवला आहे.