News Flash

मृत व्यक्तीच्या नावे किती दिवस जेवणार?

प्रश्न करोनाकाळातील संकटची गंभीर जाणीव निर्माण करणारा.

|| सुहास सरदेशमुख 

मदत आटल्यानंतर ६२ एचआयव्हीग्रस्त मुलांसह राहणाऱ्या बारगजे यांचा सवाल

औरंगाबाद :  ‘नाही हो घशाखाली घास उतरत नाही. किती दिवस असं मृत व्यक्तीच्या नावाने जेवायचे?’, ६२ मुले आणि सहा महिलांचा सांभाळ करणाऱ्या ‘इन्फंट  इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेचे दत्ता बारगजे यांचा प्रश्न करोनाकाळातील संकटची गंभीर जाणीव निर्माण करणारा. गेला महिनाभर करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक दत्ता बारगजे यांना पैसे पाठवून आमच्या नातेवाइकाची पंगत घाला, असे सांगतात. दिवस भागतो म्हणून आणि मुले जगवायची म्हणून कोणाच्या तरी नावे जेवतो पण महामारीतील या मृत्यूमुळे घशाखाली घास उतरत नाही. मृत्यू सावट असणाऱ्यांना जगवायचे म्हणून दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे हे गेली १६ वर्षे बीड शहराजवळ एचआयव्ही संसर्ग झालेल्यांसाठी संस्था चालवितात. करोनामुळे मदत देणारे दाते आता कमी झाले आहेत. पण मुले जगवण्यासाठी आता या संस्थेत दिवस ढकलण्यासाठी पंगत बसते आणि पंगत उठते. पण हे सारे असे किती दिवस चालणार, हा त्यांच्यासमोरील प्रशद्ब्रा आहे.

एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या अनेक मुलांना समाज नाकारत होता. तेव्हा ममतेने आणि बाबा आमटे यांना पीडित व्यक्तींची सेवा करेन, असा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी दत्ता आणि संध्या बारगजे यांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय ‘इन्फंट इंडिया’ नावाची संस्था   २००५ मध्ये सुरू केली. या मुलांमध्ये आधीच प्रतिकारशक्ती कमी असते. महामारी आली तेव्हापासून दत्ता बारगजे यांनी त्यांची मुले प्रकल्पाच्या संरक्षण भिंती पलिकडे जाऊ दिली नाही. सर्वसाधारणपणे या मुलांना सर्दी होतेच. एड्स नियंत्रण कक्षातून त्यांच्यावर औषधोपचार होतात. साधारणत: औषधांच्या अंत्याक्षरी ‘व्हीआयआर’ म्हणजे ‘विर’ असा उच्चार असणारी औषधे यामध्ये वापरली जातात. फॅविपिराविर, रेमडेसिविर ही या श्रेणीतील औषधे. त्यामुळे करोना काळात ‘एचआयव्ही’ ग्रस्त मुलांचा सांभाळ हे अधिकच मोठे आव्हान होते. निर्जंतुकीकरण, मुखपट्टी, अंतर ठेवून वागण्याचे नियम पाळणे अपरिहार्य असल्याने सर्वांनी खूप काळजी घेतली. पण या वर्षभराच्या काळात प्रकल्पाला मिळणारी मदत आटत गेली. किराणा सामान, कपडे, औषधे आदी साहित्य मिळायचे.

अनेक जण पैशाच्या स्वरूपात मदत करायचे. ‘लोकसत्ता’च्या सर्व कार्येषु सर्वदा या उपक्रमातूनही मोठी मदत त्यांना मिळाली. पण आता पुन्हा सारे काही कोलमडून गेले आहे. मृत्यू पंगतीतून आणखी किती दिवस तगणार हे त्यांनाही सांगता येत नाही. प्रकल्पावर मृत्यूसम विषाणूचे सावट होतेच. त्याच्याशी दोन हात करण्याची धमकही आहे पण आता हतबलता अधिक वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 12:21 am

Web Title: hiv infant india relatives those died corona akp 94
Next Stories
1 ‘पीएम केअर’मधील १५० व्हेंटिलेटर निष्कृष्ट; वापराविना यंत्रणा धूळ खात
2 पुरवठादारांकडून खासगी रुग्णालयांसाठी प्राणवायूच्या दरांत वाढ
3 आपत्तीत तत्परता अन् दिरंगाईही
Just Now!
X