सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालावर करोना परिस्थितीचा परिणाम दिसून आला. करोनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत काहीशी घट होती. परिणामी यंदा सीए होणाऱ्यांच्या संख्येत गत दोन वर्षांच्या तुलनेत काहीशी घट झालेली असली, तरी मराठवाडय़ासारख्या भागात या परीक्षेची तयारी करणाऱ्यांच्या संख्येचा आलेखही अलिकडच्या काळात काहीसा चढता राहिला आहे.

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत औरंगाबाद येथील शाखेअंतर्गत २५ पेक्षा अधिक विद्यार्थी सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमात उत्तीर्ण झाले. गतवर्षी जानेवारी २०२० मधील परीक्षेत ६० पेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर २०१९ च्या जुलैमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ५० हून अधिक विद्यार्थी सीएच्या परीक्षेत यश प्राप्त केले होते. औरंगाबाद केंद्रांतर्गत या परीक्षेची तयारी ७०० ते ८०० विद्यार्थी करतात. तर मराठवाडय़ातून चार ते पाच हजार विद्यार्थी सीएची परीक्षा देतात. सीए होण्यासाठीची तयारी केंद्रीय आयोगाच्या परीक्षांप्रमाणेच करावी लागत असल्याने कसून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागते. सीए परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची आखणी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाकडून अत्यंत काटेकोर पद्धतीने केली जाते. त्यामुळे उत्तीर्णतेचे प्रमाण काहीसे कमी दिसत असले, तरी त्यातून पुढे येणाऱ्या यशवंतांची दखल सर्वाकडूनच आवर्जून घेतली जाते, असे डब्ल्यूआयआरसीच्या औरंगाबाद शाखेचे कोषाध्यक्ष गणेश भालेराव यांनी सांगितले.

औरंगाबाद शाखेकडून सीए परीक्षेच्या तयारीबाबत जागृतीही केली जाते. विद्यार्थ्यांना सीए होण्यामागचे महत्त्व पटवून दिले जाते. अलिकडच्या काळात मराठवाडय़ाच्या अनेक भागातील सर्व घटकातील विद्यार्थी सीए परीक्षेची तयारी करताना दिसतात. आता दहावीपासूनच विद्यार्थ्यांमध्ये सीए परीक्षेचे महत्त्व रुजवले जात आहे.

मराठवाडय़ात अलिकडच्या काळात सीए परीक्षेबाबतची जागृती उत्तम पद्धतीने केली जाते. यंदाच्या परीक्षेवर करोनाच्या परिस्थितीचे सावट होते. पालकांकडूनही खबरदारी म्हणून पुढील परीक्षेला प्रयत्न करावा, असे विद्यार्थ्यांना सांगितले गेले. त्याचा काहीसा परिणाम निकालावर जाणवतो.

– गणेश भालेराव, सीए, कोषाध्यक्ष.