महाराष्ट्रात औषधी, कुक्कुट खाद्य तसेच मांसाहारी पदार्थाच्या निर्मितीचे काही कारखाने उभारता येऊ शकतात काय, याच्या चाचपणीसाठी इंडोनेशियाचे वाणिज्यदूत साउट सिरिंगोरिंगो, दूतावासातील अर्थ विभागाचे हेरिआता सोयीटारोटो यांच्यासह अधिकाऱ्यांनी गुरुवारी येथे भेट दिली. मराठवाडा चेंबर्स ऑफ इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर या उद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी उद्या (शुक्रवारी) ते चर्चा करणार असून, वेगवेगळय़ा क्षेत्रांत गुंतवणूक करता येईल का अथवा येथील उद्योजकांना इंडोनेशियात उद्योग सुरू करण्यास प्रवृत्त करता येईल का, याची चाचपणीही ते करणार आहेत. इंडोनेशियाचे वाणिज्यदूत सिरिंगोरिंगो यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ही माहिती दिली.
इंडोनेशिया आणि भारताचे व्यापारी संबंध जुने आहेत. अलीकडच्या काळात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काही करार केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही इंडोनेशियास भेट दिली होती. या पाश्र्वभूमीवर ‘मेक इन इंडिया’त काही गुंतवणूक होऊ शकते काय, याची चाचपणी ते करीत आहेत. इंडोनेशियाकडून भारताला कोळसा, पामतेल आदी निर्यात केले जाते. विशेषत: कापूस व सूताचीही देवाण-घेवाण या दोन देशांत सुरू आहे. पर्यटनाच्या अनुषंगानेही दोन्ही देशांतील संबंध बळकट होऊ शकतात, असेही ते म्हणाले.
गेल्या काही वर्षांत इंडोनेशियातून येणारे हिंदू गंगेत स्नान करण्यासाठी येतात. त्यांना या पुढच्या काळात जागतिक वारसा असणाऱ्या पर्यटनस्थळांना भेटी देण्याविषयी आम्ही सांगणार आहोत. ही संख्या येत्या काळात नक्की वाढेल, असे सिरिंगोरिंगो म्हणाले. दोन्ही देशांत काहीअंशी सारखेच सांस्कृतिक वातावरण आहे. अगदी इंडोनेशियातील चित्रपट निर्मितीतला माणूसही मूळ भारतीय आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक चांगले करण्यावर आमचा भर असतो. सांस्कृतिक वातावरणात साधम्र्य आहे, तसेच समस्यांतही काहीअंशी साधम्र्य असल्याचे ते म्हणाले.
भारतावरही दहशतवादी हल्ले होतात. इंडोनेशियातही या प्रकारचे हल्ले झाले आहेत. त्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने यापूर्वीच भारताशी करार झाले असल्याचे त्यांनी सांगितले. घट्ट मैत्रीसंबंध निर्माण करताना औद्योगिक क्षेत्रात अधिक देवाण-घेवाण व्हावी, यासाठी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करता येईल, याची चाचपणी उद्या होणाऱ्या बैठकीत केली जाणार आहे.
माहिती-तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, औषधी कंपन्या आणि ऑटो क्षेत्रातील गुंतवणूक इंडोनेशियात व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई, पुणे, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर आणि औरंगाबाद या जिल्हय़ांमध्ये गुंतवणुकीचे कोणते नवे क्षेत्र शोधता येऊ शकते, याची माहिती घेत असल्याचे सिरिंगरिंगो म्हणाले. भाजीपाला, तेल, कोळसा, नैसर्गिक रबर, कागद, अल्कोहोल, हायड्रोकार्बन्स, यंत्रसामग्री, औषधी, खत यांची आयात इंडोनेशियाकडून होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. गुंतवणुकीच्या अनुषंगाने उद्योजकांशी चर्चा करणार असून, भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात खाद्यपदार्थाच्या क्षेत्रात गुंतवणूक होऊ शकते का, याची चाचपणी केली जात आहे. मुस्लिम संख्या अधिक असल्याने मांसाहारी पदार्थाची आयात-निर्यात यावरही लक्ष ठेवून आहोत. ही मोठी बाजारपेठ असल्याने त्याकडे लक्ष देण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यासमवेत इंडोनेशिया व्यापारवृद्धी केंद्राचे अधिकारीही उपस्थित होते.