सावरकरांच्या पुतळ्यावरील शाइफेक हा कचऱ्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेला प्रकार असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे. त्याचबरोबर कचराकोंडीवरून त्यांनी शिवसेना-भाजप आणि खासदार चंद्रकांत खैरेंवर हल्लाबोल केला.
चव्हाण म्हणाले, चंद्रकांत खैरेंना सावरकरांशी काहीही देणे घेणे नाही. पुतळा उघड्यावर होता तेव्हा मी माझ्या निधीतून सुशोभीकरणाचे काम केले. मात्र, फक्त राजकारणासाठी शिवसेनेला त्यांची आठवण होते, असा टोलाही त्यांनी लगावला. पाणी, रस्ते, गटार योजना यांचबरोबर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका अपयशी ठरली आहे. तसेच पालिकेकडून कर वसुली देखील होत नाही. त्यामुळे पालिकेवर कडक शिस्तीचा प्रशासक नेमावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
सभागृहात आपण याबाबत प्रश्न मांडला आहे, त्यावर चर्चा होईल. मात्र, पालिकेवर शिवसेना-भाजपाने २५ वर्षे सत्ता केली. त्यांचे हे पाप असून खासदार खैरे शहरातील सर्व गोष्टीचे श्रेय घेतात. त्यांनी कचऱ्याची जबाबदरीही घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महापालिकेतील राज्यकर्ते आणि अधिकारी मस्तवाल झाले आहेत. आपले काहीही होणार नाही, हे अधिकाऱ्यांना महिती आहे. पालिकेन कचरा प्रश्नावर परदेश दौरे केले त्यात काय अभ्यास केला? याचा अहवाल द्या, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
मिटमिटा भागात कचऱ्यावरून जो हिंसाचार झाला, त्यावर बोलताना चव्हाण म्हणाले, पहिले आक्रमण पोलिसांनी केले तसेच सर्व काही मिटल्यानंतर त्यांनी घरोघरी जाऊन लोकांना मारहाण केली. १६०० लोकवस्तीच्या गावात १२०० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात काहीही सबंध नसलेल्या विध्यार्थ्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे त्यांचा पेपर बुडला. गणेश जाधव या तरुणाला जेवण करत असताना पोलीस घेऊन गेले. या सर्व प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस उपायुक्त दीपाली घाडगे यांना चौकशीप्रमुख म्हणून नेमले आहे. मात्र, त्यांनी स्वतः दगडफेक करण्याचे आदेश दिल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. तसेच जे पोलीस दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.