गोवंश हत्याबंदीचा धाक अन् हिंदुत्ववादी संघटनांच्या धास्तीचा धक्कादायक अनुभवखास

Agreli
जपानच्या चलनाचा कच्चा माल पुरवतो हिमालयाच्या कुशीतला ‘हा’ देश!
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Ambala Divisional Commissioner Renu Phulia
महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची स्थगिती उठवली, नवरा आणि मुलाने लगेचच खरेदी केला भूखंड

देशी गाय खरेदी करायची असेल तर त्यासोबत भीतीही मोफत घेण्याची तयारी ठेवा. गीर गाईचे दूध चांगले असल्याने या गाई खरेदी करण्यासाठी ओझर येथे गेलेल्या उस्मानाबादच्या दोन प्राध्यापकांना आलेला अनुभव अंगावर शहारे आणणारा आहे. संजय चव्हाण आणि रवी शितोळे या दोघांनी पुढाकार घेऊन नाशिक जिल्ह्य़ातील ओझर येथून १३ गाई खरेदी केल्या. मात्र, गोवंश हत्याबंदी कायद्याचा धाक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या धास्तीने या गाईंची वाहतूक करण्यासाठी त्यांना कोणी वाहनच उपलब्ध करून दिले नाही. अखेर उस्मानाबादहून वाहन मागवल्यानंतर देशी गाईंबरोबरचा त्यांचा भयकारक प्रवास सुरू झाला आणि गोपालनासाठी किती मोठी किंमत चुकवावी लागते, याचा धक्कादायक प्रत्यय त्यांना आला.

गुजरातमधील गीर नावाच्या या गाईची देशी जात काटक आहे. शिवाय दूधही चांगले असल्याने मुलांना ते देता यावे, या उद्देशाने संजय चव्हाण आणि रवी शितोळे साखर कारखाना परिसरात फिरत होते. गुजरातमधून आलेले गोपालक या गाई सहसा विकत नाहीत. मात्र, गुजरातमधील एका व्यक्तीला गावी परतायचे असल्याने त्याने कळप विकण्याचे ठरविले. हा कळप विकत घेतला खरा; पण सोबतीला भीतीही विकत घेतल्याचा अनुभव शितोळे यांना आला.

ओझरमध्ये वाहन न मिळाल्याने गावाकडून मागविलेले वाहन रात्री उशिरा पोहोचले. मध्यरात्रीनंतर एक वाजता गाई टेम्पोमध्ये चढविल्या. तेव्हा विक्रेता म्हणाला, आम्ही कोणी तुमच्याबरोबर येणार नाही. हिंदुत्ववादी विचारांच्या संघटना अशा गाडय़ांना अडवीत असल्याने कोणताही धोका आम्ही पत्करणार नाही, असे त्याने ऐकविताच शितोळेंची पाचावर धारण बसली. १५ किलोमीटरवरच पोलिसांनी त्यांना अडवले. जवळ असणारे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र त्यांनी दाखवले. मात्र, वाहतूक करण्याचा परवाना नाही म्हणून पोलिसांनी त्यांच्याकडून ३ हजार रुपये उकळले.

कधी कोण येतो आणि गाडी अडवून मारतो, या भीतीदायक वातावरणात सगळा प्रवास प्राध्यापकद्वयांना करावा लागला. पुढे पुन्हा जामखेड येथे पोलिसांनीच गाडी अडवली. पुन्हा पोलिसांनीच पैसे उकळले. यानंतर कसेबसे गावी पोहोचले तेव्हा शितोळेंचा रक्तदाब वाढला होता आणि संजय चव्हाण तर आजारीच पडले. गाईंबरोबर विकतचे दुखणे नि सोबतीला १२ तास भीती अशा वातावरणातून किती जणांना जावे लागते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

जोखीम टाळण्यासाठी भगवा झेंडा!

ओझर हे गणपतीचे गाव असल्यामुळे विक्रेत्याच्या इशाऱ्यानंतर हादरलेल्या प्राध्यापकद्वयींनी रात्री मंदिरासमोरील एका दुकानदाराला उठविले. त्याच्याकडून अष्टगंध व गळ्यातल्या माळा विकत घेतल्या. सोबतीला भगवा झेंडाही घेतला. तो टेम्पोला बांधला. स्वत:च्या गाडीलाही भगवा झेंडा बांधून ते निघाले.

ओझर हे गणपतीचे गाव असल्यामुळे विक्रेत्याच्या इशाऱ्यानंतर हादरलेल्या प्राध्यापकद्वयींनी रात्री मंदिरासमोरील एका दुकानदाराला उठविले. त्याच्याकडून अष्टगंध व गळ्यातल्या माळा विकत घेतल्या. सोबतीला भगवा झेंडाही घेतला. तो टेम्पोला बांधला. स्वत:च्या गाडीलाही भगवा झेंडा बांधून ते निघाले.